महामार्ग पोलिस केंद्र ठरतेय ‘लूटपॉईंट’!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

चाकूर - रस्त्यावर होणारे अपघात, चोऱ्या रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेले महामार्ग पोलिस केंद्र वाहनचालकांसाठी मदतीचे ठरण्याऐवजी अडचणीचे ठरत असून येथील पोलिसांकडून वाहनचालकांची दिवसाढवळ्या लूट केली जात आहे. 

चाकूर - रस्त्यावर होणारे अपघात, चोऱ्या रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेले महामार्ग पोलिस केंद्र वाहनचालकांसाठी मदतीचे ठरण्याऐवजी अडचणीचे ठरत असून येथील पोलिसांकडून वाहनचालकांची दिवसाढवळ्या लूट केली जात आहे. 

महामार्ग पोलिसचे प्रमुख अरूप पटनाईक यांच्या हस्ते सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यातील रस्त्यावर होणारे अपघात, चोऱ्या, दरोडे रोखण्यासाठी घरणी (ता. चाकूर) येथील शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीत महामार्ग पोलिस केंद्र सुरू करण्यात आले आहे. सुरवातीला सहायक पोलिस निरीक्षकांकडे या केंद्राचा पदभार देण्यात आला होता. नंतर पोलिस हवालदारामार्फत कारभार हाकला जात असून, जिल्ह्यातील ३१ पोलिस कर्मचारी येथे कार्यरत आहेत.

जिल्ह्यातील उजनीपासून (ता. औसा) सांगवी फाट्यापर्यंत, तसेच अंबाजोगाई रोड, बिदर रोड, बार्शी रोड या जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत या पोलिस केंद्राची हद्द आहे. यामुळे कोणात्याही रस्त्यावर पोलिस जीप थांबवून वाहनांची तपासणी केली जाते. बाजारात शेतीमाल विक्रीसाठी, तसेच जनावरे घेऊन जात असलेले शेतकऱ्यांचे टेंपो अडवून त्यांना पोलिसांकडून त्रास दिला जात आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप, ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने जातात; त्यांना मात्र अडविले जात नाही. गोरगरीब वाहनचालकांना कागदपत्रांची मागणी करून आर्थिक लूट केली जाते. 

रस्त्यावर अपघात झाल्यानंतर कोठेही महामार्ग पोलिस कर्मचारी वेळेवर पोचत नाहीत, असा अनुभव नागरिकांना अनेकदा आलेला आहे. रस्त्यावर मदत केंद्राचा मोबाईल नंबर असलेले फलकही लावलेले नाहीत. सध्या लग्नसराई सुरू आहे. ग्रामीण भागात विवाहाला जाण्यासाठी टेंपोमधून वऱ्हाडी मंडळी जात असते. त्यांचीही वाहने अडविली जात आहेत. वरिष्ठांनी महामार्ग पोलिसांच्या सततच्या त्रासापासून वाचविण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

Web Title: highway police center loot point