महामार्गाच्या कामाची वर्षभरापासून संथगती

विश्वनाथ गुंजोटे
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

 उमरगा - किल्लारी - लामजना - औसा या राज्य महामार्गाचे सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम वर्षभरापासून संथगतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये या रस्त्यावरून वाहने चालवणे अवघड झाले आहे. त्यातच पाऊस झाल्याने या रस्त्याची मोठी बिकट अवस्था असून वाहने चिखलात रुतत असल्याने येथे तासन्‌तास वाहतूक कोंडी होते. 
गेल्या वर्षभरापासून उमरगा ते किल्लारी, लामजनापर्यंतच्या सिमेंट-कॉंक्रिट रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून अद्याप कुठेही रस्ता पूर्ण झालेला नाही

किल्लारी(जि. लातूर ) : उमरगा - किल्लारी - लामजना - औसा या राज्य महामार्गाचे सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम वर्षभरापासून संथगतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये या रस्त्यावरून वाहने चालवणे अवघड झाले आहे. त्यातच पाऊस झाल्याने या रस्त्याची मोठी बिकट अवस्था असून वाहने चिखलात रुतत असल्याने येथे तासन्‌तास वाहतूक कोंडी होते. 

गेल्या वर्षभरापासून उमरगा ते किल्लारी, लामजनापर्यंतच्या सिमेंट-कॉंक्रिट रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून अद्याप कुठेही रस्ता पूर्ण झालेला नाही. जागोजागी रस्ता, पुलाचे काम अर्धवट ठेवण्यात आले आहे. काम अर्धवट ठेवून पुढे काम सुरू करण्यात आले आहे. परिणामी वाहनधारकांना कुठे कच्चा रस्ता तर कुठे सिमेंटचा रस्ता अशा चढ-उतारावरून प्रवास करावा लागत आहे. कुठे खड्डे, कुठे चिखल, कुठे दगड, तर कुठे खडीचे ढिगारे अशी या रस्त्याची अवस्था झाली आहे.

या चाळीस किलोमीटरच्या रस्त्यावरून प्रवास करण्याऐवजी बलसूर - सास्तूरमार्गे औसा तर काही उमरगा कासारशिरसी - निलंगा - लामजनामार्गे औसा असा वीस किलोमीटर लांबचा मार्ग अवलंबत आहेत. अवजड वाहनांसाठी तर हा मार्ग जणू मोठी कसरत ठरत आहे. एसटीनेही आपला मार्ग बदलला असून एसटीचालक लांबचा पर्यायी मार्ग निवडत आहेत. यात प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. 

रुग्णवाहिकेला सुरक्षित रस्ताच नाही 
वृद्ध, प्रसूतीसाठी आलेल्या महिला, अपघाती रुग्ण यांच्यासाठी तातडीची सेवा देणाऱ्या 108 आणि 102 रुग्णवाहिका या रस्त्यावरून जाणे शक्‍य नाही. गेल्या सहा महिन्यांपासून या मार्गावरून रुग्णवाहिका दिसत नाही. यासाठी मार्गावर कुठलाही सुरक्षित रस्ता राहिलेला नाही. कामाच्या ठिकाणी कुठेही फलक लावलेले नाहीत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Highway work has been slow since year