मुस्लिम मोर्चेकऱ्यांची हिंदू बांधवांकडून सोय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

लातूर - आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी येथे मुस्लिम समाजाच्या वतीने मुस्लिम आरक्षण मूकमोर्चा काढण्यात आला. रस्त्यावर ठिकठिकाणी या मोर्चेकऱ्यांची हिंदू बांधवांच्या वतीने पाण्याची सोय करण्यात आली होती. काही ठिकाणी फळांचे वाटपही झाले. मोर्चाच्या संयोजकांनी कोणाला इजा झाली तर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी औषधी स्टॉलही उभारले होते.

आरक्षण, शिक्षण व संरक्षण या प्रमुख मागणीसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या हक्कासाठी पहिल्यांदाच लाखोच्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र आले होते. या मोर्चाला कोणा एकाचे नेतृत्व नव्हते. त्यामुळे नेत्यांनाही बाजूला ठेवण्यात आले होते. सर्व सूत्रे तरुणांच्या हाती होती. एक ते दीड हजार तरुण स्वयंसेवक मोर्चाचे व्यवस्थापन करीत होते. अनेक तरुण वॉकीटाकीचा वापर करून सूचना देत होते. ध्वनिक्षेपकावरूनही शिस्तीच्या पालनासंदर्भात सूचना देण्यात आल्या. रस्त्याच्या दुतर्फा स्वयंसेवक उभे करण्यात आले होते. या मोर्चाला मराठा सेवासंघ, संभाजी ब्रिगेड, व्ही. एस. पॅंथर, मराठा क्रांती मूकमोर्चा अशा विविध संघटनांनी पाठिंबा दिला होता. पत्रक काढून पाठिंबा न देता या संघटनांचे कार्यकर्ते मोर्चेकऱ्यांच्या सेवेत दाखल झाले होते. ठिकठिकाणी पाण्याचे स्टॉल्स उभे करून सेवा करण्यात येत होती. अनेक ठिकाणी फळांचे वाटपही करण्यात येत होते. मोर्चाच्या संयोजकांनीदेखील मोर्चेकऱ्यांच्या सुविधांकडे लक्ष दिले होते. त्यांच्या वतीने आजारी असलेल्या किंवा चालताना इजा झाली तर उपचार करता यावा म्हणून औषधी स्टॉल उभा करण्यात आला होता. मोर्चानंतर कचरा होण्याची शक्‍यता लक्षात घेता तातडीने स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली. ईदगाह मैदानाचा परिसर व रस्त्यावरील कचराही साफ करून स्वच्छता केली.

Web Title: Hindu brothers Facility muslim morcha