esakal | Hingoli : २९६ गावात एक गाव एक गणपती आवाहनाला भरघोस प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli

Hingoli : २९६ गावात एक गाव एक गणपती आवाहनाला भरघोस प्रतिसाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यांमध्ये २९६ ठिकाणी एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली असून जिल्ह्यात ९८० ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना झाली आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी ता.दहा गणेश मुर्तीची शांततेत स्थापना करण्यात आली. मागील पंधरा दिवसांपासून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , यांच्यासह पोलीस अधीक्षक राकेश कलासागर , अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे , सहायक पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांनी गणेश मंडळांच्या व शांतता समितीच्या बैठका घेऊन कोविडच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते.

तसेच गणेश मंडळांनी एक गाव एक गणपती राबविण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते. हिंगोली जिल्ह्यात प्रशासनाच्या या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल २९६ गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली आहे. त्यामुळे या गावात गणेशमुर्ती पाहण्यासाठी होणारी गर्दी कमी होणार आहे. त्यातून सामाजिक अंतराचे पालन देखील होणार आहे.

जिल्ह्यामध्ये एकूण ९८० ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना झाली आहे . यामध्ये शहरी भागात २४९ ठिकाणी ग्रामीण भागामध्ये ७३१ ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे . पोलीस प्रशासनाने गणेशमूर्ती स्थापना मिरवणुकीला परवानगी नाकारली. ना ढोल ना ताशा, ना गुलालाची उधळण, व जय घोषाच्या गजरा विना गणेश मंडळांनी साध्या पद्धतीने गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. जिल्ह्यात गणेश मंडळांच्या ठिकाणी तसेच संवेदनशील भागात पोलिसांची गस्त सुरू करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह राज्य राखीव दलाचे जवान तसेच गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले असल्याचे पोलिस प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

loading image
go to top