हिंगोली अपघात : ट्रक- दुचाकीच्या धडकेत पती ठार तर पत्नी गंभीर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

अपघातात पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. सहा) दुपारी बाराच्या सुमारास घडली.

हिंगोली : आखाडा बाळापुर ते कळमनुरी मार्गावर कामठा फाटा शिवारात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. सहा) दुपारी बाराच्या सुमारास घडली. जखमी महिलेला उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्धापूर तालुक्यातील लहान येथील राजकुमार मारुती कुराडे व त्यांच्या पत्नी चंचलाबाई राजकुमार कुराडे हे दोघे जण त्यांच्या दुचाकी वाहनावर (एमएच २६ जे ३०८९) वाशिम येथे सासरवाडीला जात होते. त्यांची दुचाकी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कामठा फाटा शिवारात आली असताना कळमनुरी येथून नांदेडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक क्रमांक (एमपी 09 एचजी २४३४) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये राजकुमार कुराडे (वय ५२) हे ट्रकच्या समोरील चाकाखाली आल्याने ते जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी चंचलबाई कुराडे (वय ४५) या गंभीर जखमी झाली.

हेही वाचातराफे विरुद्ध बोटी सामना रंगणार... काय आहे प्रकार वाचा...?

बाळापूर पोलिसांची घटनास्थळी धाव

अपघाताची माहिती मिळाताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, उपनिरीक्षक अच्युत मुपडे व भरत देसाई, येलकी येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या श्रीमती कुऱ्हाडे यांना उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवले आहे.

ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या खाली
 
या अपघातानंतर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या खाली जाऊन उलटला. मात्र ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. घटनास्थळावर श्री कुराडे यांच्या जवळ असलेल्या पिशवीत नवीन कपडे, भाजीपाला व इतर साहित्य असल्यामुळे ते दोघेही वाशिम येथे धार्मिक कार्यक्रमासाठी जात असावे, अशी शक्यता बाळापुर पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli accident: Husband killed, wife seriously injured in truck-bike collision hingoli news