
हिंगोली : कृषी केंद्रांवर भरारी पथकांची नजर
हिंगोली : जिल्ह्यात खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये खते, बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांना एमआरपी दरातच खते, बियाणे उपलब्ध व्हावेत, एकाही कृषी केंद्र धारकाने शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करू नये, यासाठी जिल्ह्यात सहा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरील पथके कृषी केंद्रांवर करडी नजर ठेवणार आहेत.
कृषी विभागाने जिल्हास्तरावर एक तर तालुका स्तरावर प्रत्येकी एक असे मिळून सहा भरारी पथकांची स्थापना केली आहे. कृषी केंद्राने एमआरपी पेक्षा अधिक दराने शेतकऱ्यांना खताची विक्री केल्यास शेतकऱ्यांच्या तक्रारी वरून संबंधित कृषी केंद्रावर पथकाकडून कारवाई केली जाणार आहे. अनुदानावर बियाणे उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटीकडे अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी नीलेश कानवडे हे पथक प्रमुख राहणार आहेत. तसेच उपविभागीय कृषी अधिकारी एस. व्ही. लाडके (सदस्य), के. एम. ठोंबरे (मोहीम अधिकारी, सदस्य), श्री. जाधव (निरीक्षक वजने मापे, सदस्य) तर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक बी. एस. जेवे यांचा सदस्य, सचिव म्हणून पथकात समावेश आहे. तालुकास्तरावर प्रत्येकी एक यामध्ये तालुका कृषी अधिकारी हे पथक प्रमुख राहतील.तसेच पंचायत समितीचे कृषी अधिकारी सदस्य सचिव, मंडळ अधिकारी सदस्य राहतील. याशिवाय वजने मापे निरीक्षक हे सदस्य म्हणून पथकात काम पाहणार आहेत.
२७ लाख क्विंटल बियाणे खरीप हंगामासाठी उपलब्ध
हिंगोली : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी विविध बियाणे उपलब्ध झाले आहेत. यात २७ हजार ८६५ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे, अशी माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली आहे. संकरित कापसाचे ३५ हजार ३१५ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. तर,ज्वारीचे ४.५, बाजरी एक क्विंटल, मूग १६७ क्विंटल, उडीद १८४ क्विंटल, तूर ४१५ क्विंटल, मक्का दोन क्विंटल, तीळ ०-१५ क्विंटल तर सोयाबीनचे २६ हजार ९८० क्विंटल एवढे बियाणे उपलब्ध झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यात प्रमुख खरीप पीक म्हणून सोयाबीन ओळखले जाते. जिल्ह्यात एकूण सोयाबीन पुरवठा पैकी आतापर्यंत महाबीजचे ५८ क्विंटल, खासगी ४,९०० तर दोन्ही एकत्रित चार हजार ९५८ क्विंटल एवढे सोयाबीनचे बियाणे विक्री झाले आहे. शेतकऱ्यांनी कोणतेही बी- बियाणे व खते खरेदी करताना शासनाने ठरवून दिलेल्या दरातच त्याची खरेदी करावी, कृषी सेवा केंद्रांकडून ज्यादा दर सांगण्यात येत असतील तर आशा कृषी केंद्रांची तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी नीलेश कानवडे यांनी केले आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी केंद्रांकडून एमआरपी पेक्षा अधिक दराने खते, बियाणे विक्री केली जात असल्यास शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी. बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी पक्क्या पावत्या घाव्यात. तसेच शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.
-गोविंद बंटेवाड, तालुका कृषी अधिकारी, हिंगोली
Web Title: Hingoli Agricultural Centers Flying Teams Keep
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..