हिंगोली : सोयाबीनचे नुकसान झाल्याने दिवाळीला बाबानी कपडे घेतले नाही, एका चिमुकलीने पाठविले मुख्यमंत्र्यांना पत्र

राजेश दारव्हेकर
Monday, 16 November 2020

यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टीने  तसेच परतीच्या पावसाने सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. पेरणी ते काढणी असा झालेला खर्च देखील निघाला नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत

हिंगोली : यावर्षी जिल्ह्यात परतीच्या पावसाने काढणीस आलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले. यामुळे दिवाळीसाठी अनेकांना आर्थिक अडचणी आल्या आहेत. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील सहाव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका चिमुकलीने पिकाच्या नुकसानीमुळे बाबांनी दिवाळीला कपडे व फटाके घेतले नसल्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.

यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टीने  तसेच परतीच्या पावसाने सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. पेरणी ते काढणी असा झालेला खर्च देखील निघाला नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. दरवर्षी सोयाबीन विक्री नंतर दिवाळी साठी हातात पैसा येतो त्यावर दिवाळी साजरी होते. यातून कुटुंबातील लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत कपडे अवार्जून खरेदी केले जातात. तसेच इतरही वस्तू खरेदी करण्यावर भर असतो. यावर्षी सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी दिवाळी साधेपणाने साजरी केली आहे. 

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील न्यु हायस्कूलमध्ये सहाव्या वर्गात ताकतोडा येथील समिक्षा सावके ही शिक्षण घेते. तीला तिच्या बाबांनी दिवाळीला कपडे व फटाके देखील घेतले नाहीत. यामुळे तिने बाबांना हा प्रश्न विचारला तर बाबांनी तिला दिलेले उत्तर तीने एका पत्राद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एका पत्राद्वारे कळविले आहे.

हेही वाचा हिंगोली : उघडले औंढा नागनाथाचे द्वार- झाला हर, हर महादेवाचा गजर

तिच्या बाबांनी तिला दिवाळीला कपडे घेतले नाहीत याचे उतर देताना सांगितले की, यावर्षी ऐन सोयाबीन काढणीला पाऊस आला, यापावसात सोयाबीन पिकाला चौरे फुटले, त्यामुळे सोयाबीन काढणीस अडचणी आल्या, सोयाबीन काढल्यावर उतारा घटला, परिणामी यासाठी झालेला खर्च देखील निघाला नाही. तसेच या नुकसान भरपाईचे मिळणारे पैसे बँकेत जमा होणार होते मात्र ते देखील जमा झाले नसल्याने  दिवाळीला आपल्याकडे पैसेच नसल्याने दिवाळीला कपडे व फटाके खरेदी करु शकलो नाही असे सांगितले.

त्यानंतर समिक्षा व तिचा भाऊ श्रीधर यांनी बाबाना दुसरा प्रश्न विचारला बाबा दिवाळीला सगळे घरी असताना रात्री तुम्ही शेतात कशाला जाता. तिला बाबा म्हणले आपल्या शेतात दिवसा लाईट नसते रात्री असते यामुळे पिकाला पाणी देण्यासाठी रात्री शेतात जावे लागते असे उतर तिच्या बाबांनी दिले. समिक्षाने बाबांना विचारलेले प्रश्न व बाबांनी दिलेली उत्तरे तीने या बाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवून हि माहिती त्यांच्यापर्यंत पोहचविली आहे. या पत्राची सर्वत्र चर्चा होत आहे.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Bafather did not wear clothes on Diwali due to soybean damage, a letter sent to CM hingoli nrews