हिंगोलीत कोरोनाचा विळखा आणखी घट्ट

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

मोठ्या शहरांतून येणाऱ्या नागरिकांमध्येच कोरोनाची जास्त लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या १५१ झाली असून यातील ८९ रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सध्या ६२ रुग्ण उपचार घेत आहेत. 

हिंगोली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असतानाच शनिवारी (ता. २३) दिवसभरात पन्नास कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण संख्या १५१ झाली असून यातील ८९ रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सध्या ६२ रुग्ण उपचार घेत आहेत. मोठ्या शहरांतून येणाऱ्या नागरिकांमध्येच कोरोनाची जास्त लक्षणे आढळून येत असल्याने प्रशासनही चिंतेत पडले आहे. त्यामुळे शहरीसह ग्रामीण क्षेत्रातील काही भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

मुंबई येथून आलेल्या सहा रुग्णांना शनिवारी (ता. २३) सकाळी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पुन्हा सेनगाव येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या १३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला. यातील दहा रुग्ण मुंबईवरून, तर तीन रुग्ण दिल्लीवरून आलेले आहेत. 

हेही वाचालॉकडाउनच्या कात्रीने टेलरिंग व्यवसायाचे तुकडे

बाधित हिंगोली तालुक्यातील रहिवासी

रात्री साडेअकरा वाजता आलेल्या अहवालाने तर जिल्हावासीयांची झोपच उडवली. यामध्ये तब्बल ३१ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यात मुंबई येथून आलेल्या २२, औरंगाबाद चार, रायगड एक, बिदर (कर्नाटक) वरून आलेल्या एका जणांचा समावेश आहे. हे सर्व हिंगोली तालुक्यातील रहिवासी आहेत.

एकूण १५१ कोरोनाबाधित रुग्ण

 तसेच दोन रुग्ण भिरडा येथील रुग्णाच्या संपर्कातील आहेत. तसेच यामध्ये समूदाय आरोग्य अधिकाऱ्याचा समावेश आहे. दरम्यान, आता एकूण १५१ कोरोनाबाधित रुग्ण झाले असून त्यापैकी ८९ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता ६२ रुग्ण उपचार घेत आहेत. 

प्रशासनही चिंतेत पडले 

दरम्यान, मोठ्या शहरांतून येणाऱ्यांची संख्या वाढली असून यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असताना आता रुग्ण वाढत असल्याने प्रशासनही चिंतेत पडले आहे. 

जिल्ह्यातील काही क्षेत्र कंटेन्मेंट झोन घोषित

जिल्ह्यातील काही भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने त्‍याचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी शहरी व ग्रामीण क्षेत्रातील काही भाग हा कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी रविवारी (ता. २४) दिली.

येथे क्लिक कराआठशे किलोमीटर धावली अन् रिकामी परतली...

हिंगोली शहरातील काही भागाचा समावेश

कंटेन्मेंट झोनमध्ये हिंगोली शहरातील सिद्धार्थनगर, जवळा पळशी रोडची डावी बाजू, बागवानपूरा-तलाब कट्टा मस्जिदच्या पाठीमागे आणि गुहा चौक-पेन्शनपुरा या भागाचा समावेश आहे. तसेच ग्रामीण भागात हिंगोली तालुक्यातील बासंबा, खंडाळा, इंचा, वडद, माळसेलू, लिंबाळा, गंगानगर (कारवाडी ग्रामपंचायत क्षेत्र) आणि आनंदनगर (बळसोंड ग्रामपंचायत क्षेत्र) 

आवश्यक सेवा या भागात बंद

सेनगाव तालुक्यातील माझोड, बरडा, खुडज आणि सूरजखेडा या गावांचा कंटेन्मेंट झोनमध्ये समावेश आहे. कंटेन्मेंट झोन परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली असून सर्व आवश्यक सेवा या भागात बंद करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार सेवा देण्यात येणार आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Hingoli, the corona grip is even tighter Hingoli news