हिंगोली जिल्ह्यात एक लाख १० हजार हेक्टर पिकाचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hingoli Farmers crop damage compensation

हिंगोली जिल्ह्यात एक लाख १० हजार हेक्टर पिकाचे नुकसान

हिंगोली : जिल्ह्यात जून-जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाने नुकसानीचे सर्वेक्षण केले. १ लाख ३० हजार शेतकऱ्यांच्या एक लाख १० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनास सादर केला. या शेतकऱ्यांसाठी १५४ कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याचे प्रशासनाच्या सर्वेक्षणातून निष्पन्न झाले.

यावर्षी जून महिन्याच्या शेवटी अतिवृष्टी झाली होती. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ९० टक्के पाऊस झाला. या अतिवृष्टीने नदी, नाले आणि ओढ्या काठावर असलेल्या शेतीचे नुकसान झाले आहे. अनेकांची पिके व जमीन खरडून गेली. शासनाने याची दखल घेत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रशासकीय पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. यात एक लाख ३० हजार शेतकऱ्यांचे एक लाख १० हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी १५४ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. तशी मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे.

अशी लागणार मदत

हिंगोली तालुका ः ८१५१ शेतकऱ्यांचे ८७५५ हेक्टरचे नुकसान झाले. त्यांना मदतीसाठी ११ कोटी ५० लाख रुपयांचा निधी लागणार आहे.

सेनगाव तालुका ः २६ हजार ७०३ शेतकऱ्यांचे २२ हजार १२२ हेक्टरचे नुकसान झाल्याने त्यांना मदतीसाठी ३० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.

वसमत तालुका ः ४६ हजार १२० शेतकऱ्यांचे ४१ हजार ४८ हेक्टरचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना मदतीसाठी ५६ कोटी ७० लाख रुपयांचा निधी लागणार आहे.

औंढा तालुका ः ११ हजार ६७० शेतकऱ्यांचे ५२५० हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्यांना मदतीसाठी ७ कोटी १४ रुपयांचा निधी लागणार आहे.

कळमनुरी तालुका ः ३८ हजार ९२५ शेतकऱ्यांचे ३४ हजार ८६५ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना ४९ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.