हिंगोली जिल्हाधिकार्‍यांची कळमनुरीतील कंटेनमेंट झोनला भेट देऊन पाहणी.

संजय कापसे
Saturday, 25 July 2020

आजाराच्या काळात प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिक व व्यापारी वर्गाविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस व पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिल्या.

कळमनुरी (जिल्हा हिंगोली) : जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळमनुरी शहरातील कंटेनमेंट झोन असलेल्या भाजी मंडई परिसराला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आजाराच्या काळात प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिक व व्यापारी वर्गाविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस व पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिल्या.

कोरोना आजारामुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने भाजी मंडई व लगतचा परिसर कंटेनमेंट    झोन म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या हालचालीवर प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी श्री जयवंशी यांनी या भागाला भेट देऊन पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, मुख्याधिकारी उमेश कोठीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ रौफ शेख, वैद्यकीय अधिक्षक डॉ. आनंद मेने, वैद्यकीय अधिकारी महेश पंचलिंगे, पालिका कर्मचारी मोहम्मद जाकीर, मनोज मकवाल यांची यावेळी उपस्थिती होती.

नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या कंटेनमेंट झोन परिसराची पाहणी करत दुसऱ्या बाजूने शहरातील मुख्य रस्त्यावर येऊन पाहणी केली यावेळी मास्क न बांधता व्यवसाय करणाऱ्या व्यापारी व नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांनी खडे बोल सुनावले. आजाराचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाकडून नागरिकांसाठी देण्यात आलेल्या नियमावलीची अमल बजावणी व नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीमध्ये शहरातील नागरिकांचा सार्वजनिक ठिकाणी बिनधास्त होत वावर व कंटेनमेंट झोन असलेल्या परिसरांमधून नागरिकांची नियमित होणारी ये-जा पाहता प्रशासनाने याबाबतीतही कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

हेही वाचानांदेड : कोरोनाची रुग्णसंख्या कमी होण्यासाठी विविध विभागात हवाय समन्वय

तहसिलदार यांनीही केली पाहणी

येथील कोवीड केअर सेंटरला तहसीलदार कैलास चंद्र वाघमारे यांनी पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसह भेट देऊन इमारतीची स्वच्छता करून घेत पाहणी केली व येथे उपचारासाठी दाखल असलेल्या नागरिकांना स्वयंशिस्त पाळण्याचे त्यांनी आवाहन केले. याबाबत तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख यांच्यासह पालिकेचे स्वच्छता कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सेंटरची पाहणी केली. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे येथील कोविड केअर सेंटरमध्ये आजाराचा संसर्ग झालेले नऊ रुग्ण व आजारी रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ३५ अशा एकूण ४४ नागरिकांना ठेवण्यात आले आहे. या इमारतीमध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी जिल्हास्तरावरून नेमून देण्यात आलेल्या संस्थेने काम करण्यास लेखी नकार कळविला आहे. त्यामुळे इमारती अंतर्गत स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

रुग्ण व संपर्कातील नागरिकांनी स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन

त्यातच या ठिकाणी वास्तव्याला असलेल्या नागरिकाकडून कुठलीही स्वच्छता पाळली जात नाही. याठिकाणी असलेल्या रुग्ण व संपर्कात आलेल्या नागरिकांकरिता प्रशासनाकडून आवश्यक त्या सोयी- सुविधा देण्याचा पूर्णतः प्रयत्न केला जात आहे. मात्र इमारतीमध्ये वास्तव्याला असलेल्या नागरिकाकडून प्रशासनाला सहकार्य न करता अस्वच्छता केली जात आहे. तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी स्वतः उभे राहून पालिका कर्मचाऱ्याकडून इमारती अंतर्गत स्वच्छता करून घेत उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्ण व संपर्कातील नागरिकांनी स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन यावेळी केले जिल्हास्तरावरून तातडीने या इमारतीच्या स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli District Collector visited the containment zone and inspected it.hingoli news