हिंगोलीत दसरा महोत्सव यावर्षी खाकीबाबा मठात होणार

राजेश दारव्हेकर
Thursday, 15 October 2020

यावर्षी कोरोना संकटामुळे या महोत्सवावर बंधने आल्याने रामलीला मैदानावर होणारा दसरा अंत्यत साध्या पध्दतीने कयाधु नदी काठावर असलेल्या खाकीबाबा मठात होणार असून रावण दहण देखील येथेच होणार आहे

हिंगोली : हिंगोलीचा दसरा हा मैसूर येथील दसर्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असल्याची राज्यभर ख्याती आहे. यावर्षी कोरोना संकटामुळे या महोत्सवावर बंधने आल्याने रामलीला मैदानावर होणारा दसरा अंत्यत साध्या पध्दतीने कयाधु नदी काठावर असलेल्या खाकीबाबा मठात होणार असून रावण दहण देखील येथेच होणार आहे.

हिंगोलीचा दसरा राज्यभर प्रसिद्ध आहे. खाकीबाबा, मानदासबाबा यांनी दसरा महोत्सव सुरू केला आहे याला १६३ वर्षाची परंपरा आहे. हा महोत्सव शहरातील रामलिला मैदानावर होत असल्याने या ठिकाणाला रामलीला मैदान असे नाव पडले आहे. या मैदानावर दहा दिवस रामलीला होते. ते पाहण्यासाठी येथे गर्दी असते. 

शहरात दहा दिवस नागरिकांची मोठी गर्दी

या जोडीला औद्योगिक प्रदर्शनी उभारण्यात येते येथे खेळाचे, साहित्य, संसारोपयोगी साहित्य, मनोरंजन यासह खाद्यपदार्थ आदी स्टाँल उभारण्यात येतात. तसेच शहरात दहा दिवस दुर्गा महोत्सव व याठिकाणी होणारे कार्यक्रम यासह शहरात होणारा गरबा, दांडीया या कार्यक्रमाची रेलचेल असल्याने शहरात दहा दिवस नागरिकांची मोठी गर्दी असते. तर दसर्याच्या दिवशी फटाक्यांच्या आतिषबाजीत ५१ फुट उंचीच्या रावणाचे दहण केले जाते.

आठ फुट उंचीच्या रावणाचे दहण सर्व नियम पाळत मोजक्या पाहुणे मंडळींच्या उपस्थित होणार

यावर्षी मात्र कोरोना संकटाने या सर्व कार्यक्रमावर बंधने आल्याने रामलीला मैदानावर होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आता साध्या पद्धतीने कोरोना संकटाचे शासनाने दिलेले नियम पाळत खाकीबाबा मठात कार्यक्रम होणार आहेत. दहा दिवस येथे रामलीला होणार आहे. तर दसर्याच्या दिवशी सात ते आठ फुट उंचीच्या रावणाचे दहण सर्व नियम पाळत मोजक्या पाहुणे मंडळींच्या उपस्थित होणार आहे. 

आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याची परंपरा

त्यानिमित्ताने खाकीबाबा मठात होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी सुरु झाली आहे. या मठात राम. लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या मुर्ती आहेत तर दसर्यानिमित येथे दरवर्षी शस्त्रपुजा होते. दसर्याला येथे दरवर्षी नागरिक दर्शनासाठी जातात येथे दसर्यानिमित आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याची परंपरा असल्याचे कमलदास महाराज यांनी सांगितले.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli Dussehra Festival will be held at Khakibaba Math this year hingoli news