Hingoli : हळद, कापूस, सोयाबीनने शेतकऱ्याला केली निराशा Hingoli farmer Turmeric cotton soybeans disappointed | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Turmeric cotton soybeans

Hingoli : हळद, कापूस, सोयाबीनने शेतकऱ्याला केली निराशा

औंढा नागनाथ : खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्याला नवीन हंगामासाठी पैशाची गरज आहे. परंतु, सोयाबीनचे भाव पडल्याने साठवून ठेवलेले सोयाबीन पडलेल्या भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. अशी स्थिती कापूस आणि हळद या पिकांचीही आहे. या तीनही प्रमुख पिकाने शेतकऱ्यांची निराशा केली असून, त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

औंढा येथील उपबाजार समितीमध्ये पंधरा दिवसांपूर्वी हळदीला ७ हजार ८०० ते ६ हजार ८०० रुपये भाव, सोयाबीनला ५ हजार ५०० ते ५ हजार ७०० रुपये भाव, कापसाला ९ हजार ५०० ते ९ हजार ७०० रुपये असे भाव होते. मात्र, सध्या सर्वच मालाचे भाव कमी झाले आहेत.

सध्या उपबाजार समितीत हळदीला ५ हजार ५०० ते ६ हजार रुपये भाव तर सोयाबीनला ५ हजार ५००ते ५ हजार ७०० रुपये भाव, कापसाला ६ हजार ५०० ते ६ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. मागील वर्षी चांगला भाव होता. त्यामुळे यावर्षीसुद्धा चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी हळद, सोयाबीन, कापूस राखून ठेवले.

परंतु, हळद, कापूस आणि सोयाबीनच्या भावाचे यावर्षी गणितच बिघडले. मे जूनमध्ये भाव वाढतील आणि आलेला पैसा खरीप हंगामाचे कामी येईल, या अशाने शेतकऱ्यांनी हळद, कापूस आणि सोयाबीन विक्री थांबवली होती. यावर्षी सरासरी सुरुवातीपासून सोयाबीनला सहा हजारांच्या आतच भाव मिळाला. भावात सध्या घसरण सुरू आहे. उप बाजारसमितीत खरेदीदारसुद्धा कमी झाले असून, अनेकांनी खरेदी थांबविली.

अनेक शेतकरी हळद, कापूस आणि सोयाबीन भाववाढीच्या प्रतीक्षेत असून, कमी होत असलेल्या भावाने हवालदिल झाले आहेत. चांगल्या प्रतीचे सोयाबीन हळद कापूससुद्धा शेतकऱ्याला गरजेपुरते कमी भावात विकावे लागत आहे. भावात घसरण होत असल्याने आवकही मंदावली आहे. उत्पादन खर्च आणि मिळणारा भाव याचा ताळमेळच बसत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.

तिहेरी फटका

भाववाढीच्या आशेने कापूस साठवून ठेवला. देणेदारासाठी व्याजाने पैसे काढले. परंतु, भाववाढ झाली नाही आणि कमी झालेल्या भावाचा फटका बसलाच. सोबतच महिन्याचे व्याज शेतकऱ्यांना भरावे लागत आहे. पत्र्याच्या खोलीतील कापसाचे तीव्र उन्हामुळे वजन घटले आहे, पडलेले दर वाढलेले व्याज आणि घटलेले वजन असा तिहेरी फटका कापूस उत्पादकांना सहन करावा लागत आहे.

सोयाबीन पिकाला एकरी लागलेला खर्च

  • नांगरणी, रोटावेटर ः ३५०० रुपये

  • सोयाबीन पेरणी ः १,१०० रुपये

  • ४ फवारणी खर्च ः ५,४०० रुपये

  • बियाणे ३० किलोची बॅग ः ३,८०० रुपये

  • सोयाबीन सोंगणी ः ५,००० रुपये

  • मजुरांचे गाडी भाडे ः ८०० रुपये

  • खुरपणी (निंदणी) ः ५६०० रुपये

  • मळणी ः २००० रुपये

  • डवरणी ः १००० रुपये

  • एकूण खर्च ः २६,२०० रुपये

  • झालेला खर्च वजा निघणारे उत्पादन ः २६०० रुपये

पश्चात्ताप..भांडणे अन् टोमणे..

सुरुवातीच्या मुहूर्तावर मिळत असलेल्या भावामुळे यंदा कापसाचे भाव दहा हजारांच्या वरच राहतील, ही खरी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. नऊ हजारांचा भाव आठ हजार पाचशे, आठ हजार, सात हजार पाचशेवर येऊन सुद्धा शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही. आता मात्र साडे सहा ते सात हजार रुपये प्रमाणे कापसाची विक्री करावी लागत असल्याने अनेकांना पश्चात्ताप होत आहे. ज्यांनी अगोदर विकला ते आता न विकणाऱ्यांना टोमणे मारत आहे. तर, अनेक घरांत कापूस विक्रीवरून मतभेद होऊन भांडणे होत आहे.