हिंगोली : घरफोड्या करणाऱ्या टोळीकडून पावणेपाच लाखाचे दागिणे जप्त- स्थानिक गुन्हे शाखा

राजेश दारव्हेकर
Saturday, 23 January 2021

पाच सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, चार लाख ७४ हजार रुपयांचे सोन्या- चांदीचे दागिने व दुचाकी जप्त 

हिंगोली : घरफोडया करणारे पाच सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन त्यांच्याकडुन चार लाख ७४ हजार ६०० रुपयांचे सोन्या- चांदीचे दागिने व एक दुचाकी जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतर्फे देण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील घरफोडयांचे वाढते प्रमाण पाहता पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय व त्यांच्या पथकाने घरफोडीतील विविध आरोपींचा शोध घेणे बाबत मोहिम राबविणे सुरु केले.

हटटा, वसमत ग्रामीण, आखाडा बाळापुर व कुरुंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध घरफोड्यातील आरोपी हे पुर्णा येथील असल्याचे समजले. त्यावरुन विलास शिंदे रा. वसमत, राजु उर्फ अन्या भोसले, गिडप्पा उर्फ गिड्या भोसले, राजुभाउ उर्फ सुन्ना भोसले रा. पुर्णा, आकाश  डोईजड रा. वसमत, साच्या  भोसले, गुंड्या भोसले, रिन पवार तिन्ही रा. पुर्णा हे असून घरफोड्यांतील मुद्देमाल त्यांनी चोरला असून ते सध्या त्यांचे राहते गावी आहेत. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्यावरुन सदर ठिकाणी मंगळवारी ( ता. १९) जावून आरोपींचा शोध घेतला.

हेही वाचाधर्माबाद तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांची वाळू माफियांविरुद्ध कारवाई

यावेळी विलास शिंदे, राजु उर्फ अन्या भोसले, गिडप्पा उर्फ गिडया भोसले, राजुभाउ उर्फ सुन्ना  भोसले, आकाश डोईजड हे त्यांचे घरी मिळुन आले. त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. सदर आरोपींना विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी कबुली दिली की, आम्ही सर्व आठ जणांनी मिळून सन २०२० मध्ये हट्टा, वसमत ग्रामीण, आखाडा बाळापुर व कुरुंदा हद्दीत रात्रीच्या वेळी घराचे कडी कोंडे तोडून तेथील सोने, चांदीचे दागिने , नगदी रुपये चोरुन नेले असल्याचे सांगितले. त्यांच्या ताब्यातुन चार घरफोड्यांतील गेल्या मालापैकी सोन्या चांदीचे दागिने किंमती चार लाख २४ हजार ६०० रुपयांचे व एक गुन्ह्यात वापरलेली दुचाकी ( किंमती ५० हजार रुपये) असे एकुण चार लाख ७४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन वर नमुद पाच आरोपीना यांना पुढील तपासकामी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात मुददेमालासह हजर केले आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस उपनिरीक्षक किशोर पोटे, बालाजी बोके, विलास सोनवणे, संभाजी लकुळे, भगवान आडे, आशिष उंबरकर , विठठल कोळेकर, राजुसिंग ठाकुर, शंकर ठोंबरे, किशोर कातकडे, विशाल घोळवे, किशोर सावंत, ज्ञानेश्वर सावळे, दिपक पाटील, विठठल काळे, आकाश टापरे यांच्या पथकाने केली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Five lakh jewelery seized from burglary gang Local Crime Branch hingoli news