हिंगोली शासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

जिल्हा परिषद कार्यालयात एकही कर्मचारी नव्हता. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग नोंदविल्याने जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयातून शुकशुकाट दिसून आला. अधिकारी मात्र कामावर होते. मात्र कर्मचारीच नसल्यामुळे कार्यालयातील कामे ठप्प झाली आहेत.

हिंगोली : सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी सेवानिवृत्ती वेतन योजना रद्द करावी. यासह इतर मागण्यांसाठी विविध कर्मचारी संघटनांनी मंगळवारी (ता.७) पुकारलेल्या संपाला हिंगोलीत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. संपामुळे शासकीय कार्यालयातून शुकशुकाट होता. 

येथील जिल्हा परिषदेमध्ये कर्मचारी संघटनांनी या संपात सहभाग घेतला आहे. सकाळी कार्यालयात आलेले कर्मचारी अकरा वाजता मुख्यप्रवेशद्वारावर एकत्र आले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी मागण्या मंजूर करण्याबाबत घोषणा दिल्या. 

जिल्हा परिषद कार्यालयात एकही कर्मचारी नव्हता. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग नोंदविल्याने जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयातून शुकशुकाट दिसून आला. अधिकारी मात्र कामावर होते. मात्र कर्मचारीच नसल्यामुळे कार्यालयातील कामे ठप्प झाली आहेत.

दरम्यान, तीन दिवस संप चालणार असल्याचे जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांनी सांगितले. या आंदोलनात काही संघटनांनी बाहेरून पाठिंबा दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आजच्या संपामुळे शासकिय कार्यालयात कामासाठी आलेल्या गावकऱ्यांना मात्र कार्यालयात कर्मचारीच नसल्यामुळे आल्या पावली परत जावे लागले आहे. तर शिक्षक संघटनांनीही या संपात सहभाग नोंदविल्यामुळे अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन सोडून देण्यात आले.

मात्र, शिक्षकांना संघटनेकडून योग्य माहिती मिळाली नसल्याने जिल्ह्यातील काही तालुक्यात शाळा सुरु होत्या. तर सेनगाव तालुक्यात शाळा बंद होत्या.

Web Title: Hingoli Government Office No Crowd