ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करणार : अतुल सावे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

जिल्ह्यातील नुकसानीची परिस्थिती पाहता 3 नोव्हेंबरपर्यंत पंचनामे करणे शक्य नसल्याने पंचनामा करण्यासाठी वेळ वाढवून  देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सावे यांनी सांगितले.

हिंगोली : जिल्ह्यात परतीच्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून ओला दुष्काळ जाहिर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी शनिवारी (ता. 2) पत्रकार परिषदेत दिली आहे. 

येथील शासकिय विश्रामगृहात सावे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, बाजार समितीचे सभापती हरिश्चंद्र शिंदे, शेतकरी सेनेचे रामेश्वर शिंदे पाटील केसापूरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी पालकमंत्री सावे म्हणाले की, जिल्ह्यात परतीच्या पावसाने सोयाबिन, कापूस, तुर, ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सेनगाव  तालुक्यातील हत्ता, भानखेडा, नर्सी  नामदेव, सवड, केसापूर या शिवारात भेट देऊन पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशीही संवाद साधला आहे. यामधे सोयाबिनच्या पिकांना कोंब फुटले असून, कापसाचेही नुकसान झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात साठ टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे  करण्याच्या सुचना यंत्रणेला दिल्याचे त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील नुकसानीची परिस्थिती पाहता 3 नोव्हेंबरपर्यंत पंचनामे करणे शक्य नसल्याने पंचनामा करण्यासाठी वेळ वाढवून  देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हयात ओला दुष्काळ सदृष्य परिस्थिती असून ओला दुष्काळ जाहिर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री सावे यांनी सांगितले. कॅबीनेटच्या बैठकीमधे जिल्ह्यातील नुकसानीची माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli Guardian minister Atul Save speaks at Hingoli about drought