Crime News : प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून; हिंगोली जिल्ह्यातून आरोपीला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli love crime lover killed love Accused arrested police action

Crime News : प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून; हिंगोली जिल्ह्यातून आरोपीला अटक

वणी : येथील कृष्णा अपार्टमेंटमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. गेल्या २४ तासांत या घटनेचा उलगडा करण्यात वणी पोलिसांना यश आले. डोक्यावर प्रहार करून प्रेयसीचा प्रियकराने खून केल्याची बाब तपासात समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी हिंगोली जिल्ह्यातील शिरोळी येथून अटक केली आहे.

प्रिया रेवानंद बागेसर उर्फ आरोही वानखेडे (वय २५, रा. बोर्डा, जि. चंद्रपूर, ह.मु.वणी) असे मृत तरुणीचे नाव आहे. विनोद रंगराव शितोळे (वय २५, रा. शिरोळी, ता. वसमत, जि. हिंगोली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तरुणी ही कृष्णा अपार्टमेंटमधील पहिल्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये दोन महिन्यापासून भाड्याने राहत होती.

सोमवारी (ता.२९) फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती फ्लॅटमालक राकेश डुबे (रा. गोकुळनगर) यांनी वणी पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पाहणी केली असता, प्रिया उर्फ आरोही ही दरवाजासमोर पडली होती. तिचे शरीर हे फुगलेल्या व सडलेल्या स्थितीत होते. डोक्याखाली रक्त पडल्याचे दिसून आले.

तरुणीचा मृत्यू नेमका कसा झाला, हे रहस्य उलगडण्यासाठी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनात तरुणीचा मृत्यू हा डोक्यावरील गंभीर दुखापतीमुळे झाल्याचे समोर आले.

तरुणीची आई सुनंदा बागेसर या महिलेने तक्रार दिली. त्यावरून खुनाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. सहायक पोलिस निरीक्षक माधव शिंदे यांना माहिती मिळाली की, प्रिया उर्फ आरोहीची मैत्री एका जणासोबत फेसबुकद्वारे झाली होती. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रियकरानेच गेम करून गावी पळून गेल्याची खात्री झाली. प्रियकराच्या नावाव्यतिरिक्त पोलिसांकडे दुसरी कोणतीही माहिती नव्हती. पोलिस पथकाने कौशल्याचा वापर करून विनोदचे हिंगोली जिल्ह्यातील शिरोळी गाव गाठून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, त्याने खून केल्याची कबुली दिली.

टॅग्स :Hingolipolicecrime