कळमनुरीचे माजी आमदार गजानन घुगे यांचा भाजपत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

सेनेला कळमनुरीत जोरदार धक्‍का, भाजपला कळमनुरीत घुगेंचा आधार
हिंगोली - कळमनुरीचे शिवसेनेचे माजी आमदार गजानन घुगे यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (ता.६) मुंबई येथे त्‍यांनी रात्री भाजपमध्ये प्रवेश केला.

सेनेला कळमनुरीत जोरदार धक्‍का, भाजपला कळमनुरीत घुगेंचा आधार
हिंगोली - कळमनुरीचे शिवसेनेचे माजी आमदार गजानन घुगे यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (ता.६) मुंबई येथे त्‍यांनी रात्री भाजपमध्ये प्रवेश केला.

गेल्‍या वीस वर्षापासून कळमनुरी विधानसभेच्‍या राजकारणात माजी आमदार गजानन घुगे हे सक्रिय आहेत. दोनवेळा त्‍यांना शिवसेनेची आमदारकी मिळाली. तसेच मतदारसंघात अनेक शिवसेना कार्यकर्त्यांना जिल्‍हा परिषद व इतर स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था निवडणुकीच्‍या माध्यमातून मोठ्या पदावर नेण्याचे काम त्‍यांनी इमाने इतबारे केले. जिल्‍हा परिषदेत शिवसेनेचे वर्चस्‍व कायम ठेवण्यासाठी त्‍यांनी बजावलेली भूमिका महत्‍वाची ठरली. याही वेळी कळमनुरी नगर पालिका व औंढा नगर पंचायतीमध्ये त्‍यांनी सेनेला सत्तेत आणले. याशिवाय जिल्‍हा परिषद निवडणुकीत त्‍यांची सर्वात मोठी नाराजी झाली.

शिवसेनेत नुकतेच आलेले जिल्‍हा सहसंपर्कप्रमुख डॉ. पंडितराव शिंदे यांच्‍या हातात तिकिट वाटप दिल्‍याने श्री. घुगे नाराज झाले होते. त्‍यानंतरही जिल्‍हा परिषदेत त्‍यांचे कट्‍टर विरोधक काँग्रेसचे नेते असल्‍याने शिवसेना व काँग्रेसची युती त्‍यांना रुचली नाही. ज्‍या काँग्रेसच्‍या विरोधात कळमनुरी मतदारसंघात त्‍यांनी राजकीय संघर्ष केला होता. मात्र गेल्‍या काही दिवसापासून ही सर्व नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेच्‍या कोणत्‍याही पदाधिकाऱ्यांनी प्रयत्‍न केले नाही. सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी हिंगोली जिल्‍ह्‍याच्‍या पदाधिकाऱ्यांकडे कायमचे दुर्लक्ष केले आहे. एवढेच नव्‍हे तर विधानसभा निवडणुकीच्‍या वेळी तीन विधानसभेसाठी एक सभा आयोजित केली असताना तीही रद्द केली. या सर्व प्रकाराला श्री. घुगे कंटाळलेले होते. त्‍यातच सेनेचे जिल्‍हाप्रमुख संतोष बांगर यांनी कळमनुरी विधानसभा लढवण्यासाठी दावा केला. त्‍यामुळे श्री. घुगे यांच्‍या जखमेवर मीठ चोळले गेले. शिवसेनेच्‍या माध्यमातून त्‍यांना दोनवेळा आमदारकी मिळाली होती. याशिवाय हिंगोली बाजार समितीचे ते संचालक देखील आहेत.

सेनेत असताना आपण सन्‍मानाचे राजकारण केले व कार्यकर्त्यांचा सन्‍मान वाढवला. गेल्‍या वीस वर्षात सेनेच्‍या नेत्‍यांनी आपली एकतरी चूक दाखवून द्यावी. कोणतीही चूक नसताना पक्षाने केलेले दुर्लक्ष चुकीचे होते.

- गजानन घुगे, माजी आमदार, कळमनुरी.

शिवसेनेने घुगे यांना दोनवेळा आमदारकी देखील दिली. त्‍यांना त्‍यांच्‍या कार्याचे फळ शिवसेनेने आमदारकीच्‍या माध्यमातून दिले. पक्षापेक्षा कोणी मोठे नसते हे लक्षात घेतले पाहिजे. अनेक नेते शिवसेनेतून गेले त्‍यामुळे पक्ष संपत नाही.

- संतोष बांगर, जिल्‍हा प्रमुख शिवसेना

माजी आमदार गजानन घुगे यांनी पक्ष सोडला असेल तर त्‍यांचा निर्णय आहे. शिवसेनेने सर्वांनाच मोठे केले. जिल्‍हा परिषदेच्‍या तिकिट वाटपात थोडेफार बदल झाले असतील. त्‍यामुळे पक्ष सोडण्याची गरज नव्‍हती. - डॉ. - - पंडितराव शिंदे, जिल्‍हा सहसंपर्कप्रमुख, शिवसेना.

Web Title: hingoli marathwada news ex. mla gajanan ghuge entry in bjp