विधानसभेच्‍या निवडणुकीसाठी भाजपची जमवाजमव जोरात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

बालविकासमंत्री पंकजा मुंडे व त्‍यांच्‍या कुटुंबीयांशी घुगे यांचा जुनाच स्‍नेह असून वारकरी संप्रदायातील राज्‍यव्यापी उपक्रमामध्ये सहभागी असतात. त्‍यामुळे भाजपला कळमनुरीत चांगला चेहरा मिळण्याची शक्‍यता आहे

हिंगोली - भारतीय जनता पक्षात शिवसेनेचे माजी आमदार गजानन घुगे यांनी प्रवेश केल्यानंतर बघता बघता भाजपने जिल्‍ह्यातील तिन्‍ही विधानसभा मतदारसंघामध्ये नेतृत्‍व उभारणी पूर्णत्‍वाला नेली आहे. स्‍वबळावर निवडणुका लढण्यासाठी पक्षनेत्‍यांचा आटापिटा असल्‍याचे मानले जात आहे.

मागील विधानसभा निवडणुकीच्‍या वेळी भाजपची अवस्‍था फारशी मजबूत नव्‍हती. विधानसभा निवडणुकीत आमदार तान्‍हाजी मुटकुळे व वसमतमध्ये शिवाजीराव जाधव यांनी निवडणूक लढवली. आमदार मुटकुळे हे विजयी झाले. दुसरीकडे जाधव यांनी विधानसभेनंतर टोकाई साखर कारखाना सुरू करून सहकार क्षेत्रात स्‍थान मिळविले. वसमत विधानसभेत सहकारातून राजकारण असा पॅटर्न आहे. त्‍यानुसार जाधव यांनी टोकाई कारखाना सुरू केला. वसमत विधानसभा मतदारसंघात पन्नास हजारांपेक्षा अधिक मते घेऊन त्‍यांनी स्‍वतःचे वर्चस्‍व निर्माण केले.

दुसरीकडे आमदार तान्‍हाजी मुटकुळे यांनी आमदारकीसोबत पक्षाचे जिल्‍हाध्यक्षपदही मिळविले. त्‍यासोबत त्‍यांनी जिल्‍ह्याच्‍या सर्वच विधानसभा मतदारसंघात जमवाजमव सुरू केली. जिल्‍हा परिषदेत शिवसेनेला सत्तेवरून पायउतार करता आले नाही तरी काही सदस्य निवडून आणले. तसेच हिंगोली विधानसभा मतदारसंघात त्‍यांनी कयाधू नदीवरील बंधारे व सिंचनाचा प्रश्न लावून धरला. त्‍यामुळे हिंगोली जिल्‍ह्याच्‍या सिंचन अनुशेषाची कामगिरी लक्षात घेता सिंचन संघर्ष समितीचे नेते तथा माजी खासदार शिवाजी माने यांनी भाजपमध्ये प्रवेश मिळविला.

माने यांच्‍या भाजप प्रवेशामुळे हिंगोली लोकसभेसाठी देखील हे उमेदवारीचा दावा करतील असे मानले जाते. याशिवाय त्‍यांच्‍यासोबत माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी खासदार सुभाष वानखेडे हेही भाजपमध्ये असल्‍याने लोकसभेसाठी देखील भाजप स्‍वतंत्र उमेदवार देईल अशी स्‍थिती निर्माण झाली आहे. त्‍यापाठोपाठ कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार गजानन घुगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

कळमनुरी मतदारसंघात गेल्‍या वीस वर्षांपासून घुगे यांचे राजकीय स्‍थान अढळ राहिले आहे. जिल्‍हा परिषदेच्‍या सदस्यांना सत्तेची संधी मिळवून देण्यासाठी तर दुसरीकडे काँग्रेसला विरोध करण्यासाठी त्‍यांनी मोठी कामगिरी बजावली. या विधानसभा निवडणुकीत घुगे हेही निवडणूक लढवतील. भाजपतर्फे ही निवडणूक लढवतील असे मानले जात आहे. बालविकासमंत्री पंकजा मुंडे व त्‍यांच्‍या कुटुंबीयांशी घुगे यांचा जुनाच स्‍नेह असून वारकरी संप्रदायातील राज्‍यव्यापी उपक्रमामध्ये सहभागी असतात. त्‍यामुळे भाजपला कळमनुरीत चांगला चेहरा मिळण्याची शक्‍यता आहे. एकूणच विधानसभा मतदारसंघ व लोकसभेतून इच्‍छुकांची जमवाजमव पाहता भाजप सेनेला बाजूला ठेवून स्‍वबळावर निवडणूक लढवेल की काय असा अंदाज राजकीय जाणकार काढत आहेत. 

Web Title: hingoli news; bjp state elections