विजेचे खांब पडल्याने ६५ गावाचा वीज पुरवठा बंद

संजय कापसे
रविवार, 28 मे 2017

कळमनुरी तालुक्‍यातील चित्र, वादळी वाऱ्याने ४६ खांब पडले
 

कळमनुरी : शहरासह परिसरात शनिवारी (ता. 27) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीचे उच्चदाब वाहिनीसह 46 विजेचे खांब उन्‍मळून पडल्‍यामुळे 65 गावांचा वीज पुरवठा 24 तासांपासून खंडीत झाला आहे. यामध्ये वीज वितरण कंपनीचे जवळपास 22 लाख रुपयांच्‍या वर नुकसान झाले आहे.

शहर व परिसरात शनिवार (ता. 27) रोजी झालेल्‍या वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांमधून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये घरावरील पत्रे उडून जाणे, शेतातील आखाड्यावरील पत्रे व झोपड्या उडून जाणे, जनावरांसाठी साठविलेल्‍या वैरणीचीही नासधूस झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीचे अनेक ठिकाणी 46 विजेचे पोल मुळापासून उन्‍मळून व तुटून पडले आहेत. यामुळे वीज वाहिन्‍यांच्‍या ताराही तुटल्‍या आहेत. काही ठिकाणी भरवस्‍तीत वीजेचे पोल उन्‍मळून अथवा तुटून पडले आहेत.

सुदैवाने यामध्ये काही जीवितहानी झाली नाही, तर सांडस, पुयना, सालेगाव या ठिकाणी शेतात पोल व तारा तुटल्‍या आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांना पेरणीपूर्व शेतीची मशागत करणे शक्‍य होणार नसल्‍याचे चित्र आहे. कर्मचाऱ्यांनी शेतामधील तुटलेल्‍या तारा काढून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याचे कार्यही कर्मचाऱ्यांना करावे लागणार आहे. यामुळे गौळबाजार व सांडस येथील वीज उपकेंद्रावरील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. या दोन उपकेंद्रांतर्गत गौळबाजार, शिवणी बुद्रुक, माळेगाव, तुप्‍पा, झरा, वाकोडी, खापरखेडा, बिबगव्‍हाण, नवखा, पाळोदी, पुयना, कळमकोंडा, सालेगाव, रेणापूर, नांदापूर, हरवाडी, आसोला, वारंगा मसाई, सोडेगाव, सांडस, चाफनाथ, कोंढूर, डिग्रस या गावांसह इतर अनेक गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. 

गौळबाजार व सांडस उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या कामठा येथील 33 केव्‍ही वीज केंद्रांतर्गत उच्‍च दाबाच्‍या वीज वाहीनीवरील पाच पोल, आराटी फाट्याजवळ कोसळून पडल्‍यामुळे सर्वच वीज पुरवठा खंडीत झाला आहे. गत 24  तासांपासून खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता पी.पी. साखरे, एस.पी. जकाते यांनी 25 कर्मचाऱ्यांना सोबत घेत रविवार (ता. 28) पासून काम हाती घेतले आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर विजेचे पोल उन्‍मळून पडल्‍यामुळे व उच्च वाहिनीकडून होणारा वीजपुरवठा खंडीत झाल्‍यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याचे अवघड काम कर्मचाऱ्यांसमोर उभे टाकले आहे. वादळी वाऱ्यामुळे शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या इसापूर धरणाच्या जलाशयावरील पालिकेच्‍या पाणी पुरवठा केंद्राचा वीज पुरवठाही खंडीत झाला आहे. त्‍याचा परिणाम शहरातील नागरिकांना सोसावा लागणार आहे. या ठिकाणीही वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम कर्मचाऱ्यांनी हाती घेतले आहे.

आखाडा बाळापूर व डोंगरकडा भागातही वादळी वाऱ्यामुळे वीजेचे पोल पडून वीज पुरवठा खंडीत होण्याबरोबरच वीज वितरण कंपनीचे नुकसान झाले आहे. एकंदरीत वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीचे 46 ठिकाणी पोल पडून व तारा तुटून .वीज वितरण कंपनीचे जवळपास 22 लाख रुपयांच्‍या वर नुकसान झाले आहे. खंडीत झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्‍या कर्मचाऱ्यांनी प्रयत्‍न चालविले आहेत.

Web Title: hingoli news electricity poles collapse