हिंगोली: शेतकऱ्यांच्‍या बंदला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

strike
strike

हिंगोली - जिल्‍हाभरात शेतकरी आंदोलनामध्ये सोमवारी (ता.5) जिल्‍हाबंदला मोठा प्रतिसाद मिळाला. सर्व बाजारपेठ ठप्‍प झाली होती. त्‍यासोबत ग्रामीण भागात अनेक प्रकारे आंदोलकांनी सहभाग नोंदवला

जिल्‍ह्‍यात आज सार्वजनिक बंदचे आयोजन केले होते. या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी स्‍वतःहून पुढाकार घेत त्‍यांची दुकाने बंद ठेवली. त्‍यासोबत मराठा शिवसैनिक सेनेचे संस्‍थापक अध्यक्ष विनायक भिसे पाटील यांच्‍यासह संघटनेच्‍या पदाधिकाऱ्यांनी बाजारात फिरून बंदचे आवाहन केले. शिवसेना जिल्‍हाप्रमुख संतोष बांगर यांनी देखील त्‍यांच्‍या पदाधिकाऱ्यांसमवेत बंदमध्ये सहभाग नोंदवला.

शहरामध्ये अनेक ठिकाणी दुधाच्‍या कॅन रस्‍त्‍यावर ओतून देण्यात आल्‍या. तसेच टरबूज व भाजीपाला फेकून देण्यात आला. त्‍यासोबत शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी रस्‍ता अडवण्याचे प्रकार केले. सेनगाव तालुक्‍यातील गोरेगाव येथे मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्‍मक प्रेतयात्रा काढण्यात आली. येहळेगाव सोळंके येथे टायर जाळण्यात आले. तसेच कळमनुरी तालुक्‍यातील साळवा पाटीजवळ अकोला-लातूर या बसवर दगड मारून काच फोडण्यात आली.

कळमनुरी तालुक्‍यात तीन बसवर दगडफेक
कळमनुरी - शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी (ता.5) कळमनुरी बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. शिवसेना व अजित मगर मित्रमंडळाच्‍या कार्यकर्त्यांनी बंदसाठी पुढाकार घेतला. तालुक्‍यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी उत्‍स्‍फूर्तपणे आंदोलन केले. तसेच रास्‍तारोकोमुळे वाहतूक विस्‍कळीत झाली. शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी (ता.5) आंदोलन झाले. आठवडी बाजारात दुकाने बंद राहिली. मसोड फाटा येथे मसोड, शिवणी, जटाळवाडी गावातील शेतकरी उत्‍स्‍फूर्तपणे रास्‍तारोकोत सहभागी झाले. त्‍यानंतर चिंचोर्डी, पार्डीमोड फाटा, कामठा फाटा येथे शेतकऱ्यांनी आंदोलन करून सहभाग घेतला. शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने सुरु होती. तेव्‍हा आंदोलकांनी दुकाने बंद करण्यास भाग पाडले. यासाठी शिवसेना कार्यकर्ते व अजित मित्रमंडळाच्‍या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. जुना बसस्‍थानक भागात रास्‍तारोको करण्यावरून शिवसेना कार्यकर्ते व पोलिस अधिकाऱ्यांमध्ये शाब्‍दिक चकमक झाली. शिवसेनेचे तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, शहरप्रमुख संतोष सारडा, आप्‍पाराव शिंदे, बाळू पारवे, गोपू पाटील, महेश शिंदे, बबलू पत्‍की, शिवा शिंदे, अय्याज पठाण, अजित मगर मित्र मंडळाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. जि.प. सदस्य अजित मगर, प्रभाकर पतंगे, आबासाहेब लोंढे, सचिन पाटील, विशाल तवले, संदीप पतंगे, शाम वानखेडे, आनंद ढोके, परसराम शिंदे यांच्‍यासह अनेक आंदोलकांचा सहभाग होता. पार्डी मोड येथे हिंगोली आगाराची नांदेड-हिंगोली (एमएच 14/बीपी 1108) या बसच्‍या काचा फोडल्‍या. नांदेड आगाराच्‍या नांदेड-हिंगोली (एमएच 14/बीपी 1051) या बसच्‍या काचा फोडल्‍या. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

गोरेगावात प्रतिकात्‍मक प्रेतयात्रा
गोरेगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्‍मक पुतळ्याची अंत्‍ययात्रा गावातील मुख्य रस्‍त्‍यावरून काढण्यात आली. यावेळी शेतकरी वर्गाच्या मागण्या पूर्ण करण्याच्या घोषणांनी गाव दणाणून गेले. प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्‍ययात्रा बसथांब्यावर आल्यानंतर प्रतिकात्मक पुतळ्याला आंबे, भेंडी व इतर भाजीपाला यांचा हार घालण्यात आला अणि दुधाचा अभिषेक करण्यात आला.

औंढ्यात तीन तास आंदोलन
औंढा नागनाथ - तालुक्‍यातील वगरवाडी व वगरवाडी तांडा येथे शेतकऱ्यांच्‍या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी तीन तास रास्‍तारोको आंदोलन केले. नांदेड व औरंगाबाद राज्‍य महामार्गावर हे आंदोलन केले. या आंदोलनामुळे शेकडो वाहने रोडवर थांबली होती. रास्‍तारोको आंदोलनात दत्तराव कदम, सचिन राठोड, बाळू चव्‍हाण, बालाजी पाटील, बाबू नाईक, रंगराव कदम, दत्तराव फुलपगार, बाळू कदम, नवनाथ बोबडे, सुरेश कदम, बाबूराव राठोड, रमेश राठोड, अंकूश राठोड यांच्‍यासह दोनशे शेतकरी सहभागी झाले होते. सकाळी नऊ वाजल्‍यापासून या आंदोलनास सुरुवात झाली. दरम्‍यान, शहरामध्ये दूध व भाजीपाला रस्‍त्‍यावर फेकून देत आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख साहेबराव देशमुख, जिल्‍हा युवा सचिव मनोज देशमुख, अनिल देशमुख, जी.डी. मुळे, राम मुळे, महादेव गोरे, राहूल दंतवार, बंडू चौंढेकर, सुंदर देशमुख, विष्णू जाधव आदी सहभागी झाले होते.

सवड येथे रास्‍तारोको
सवड - हिंगोली तालुक्‍यातील सवड येथे शेतकरी बंदसोबत आज सकाळी रास्‍तारोको आंदोलन करण्यात आले. त्‍यामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्‍ती व्‍हावी शेतीला आठ तास वीज पुरवठा व्‍हावा, दुधाला 75 रुपये लिटर भाव मिळावा. शेतीसाठी कर्जपुरवठा करावा. स्‍वामीनाथन आयोग लागू करून उत्‍पन्न खर्च अधिक पन्नास टक्‍के नफ्यावर आधारित हमीभाव द्यावा. शेतकरी विरोधी आयात निर्यात व साठ्याची धोरणे रद्द करावी आदी मागण्यासाठी आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी पोलिस निरीक्षक जगदीश भंडारवार व इतर पोलिसानी बंदोबस्‍त ठेवला होता.

शिरड शहापूरमध्ये रास्‍तारोको आंदोलन
शिरड शहापूर ः तालुक्‍यातील शिरड शहापूर येथे शेतकऱ्यांनी कडकडीत बंद पाळून आंदोलन सहभाग नोंदवला. तसेच रास्‍तारोको आंदोलन करण्यात आले. त्‍यानंतर संपूर्ण कर्जमाफी, स्‍वामीनाथन आयोगाच्‍या शिफारशी लागू करणे, यासाठी कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच वसमत ते हिंगोली रस्‍त्‍यावर रास्‍तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे शेकडो वाहने दोन्‍ही बाजूने अडकली होती. यावेळी पोलिस अधिकारी शंकर वाघमोडे, जमादार वाघमारे यांनी बंदोबस्‍त ठेवला. या आंदोलनात माजी सरपंच बालाजी कोरडे, जिल्‍हा परिषद सदस्य श्रीशैल्‍य स्‍वामी, मुंजाजी जोगंदड, रावसाहेब जोगदंड, मदन अंभोरे, लक्ष्मण जोगदंड आदी सहभागी झाले होते.

येहळेगाव येथे आमदाराची गाडी अडवली
येहळेगाव सोळंके ः येथील हिंगोली ते औंढा रस्‍त्‍यावर शेतकऱ्यांनी रास्‍तारोको आंदोलन केले. यावेळी सरकारच्‍या विरोधात घोषणा देत मुख्यमंत्र्यांच्‍या प्रतिकात्‍मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी रस्‍त्‍यावर एकत्र आले होते. शेतीमालाला भाव वाढून द्यावे, दुधाचे भाव वाढवावेत, शेतकऱ्यांची लुट थांबवावी आदी विषयावर आंदोलन करण्यात आले. तसेच मुख्य रस्‍त्‍यावर टायर जाळल्‍यामुळे बराचवेळ वाहतूक ठप्‍प होती. या आंदोलनात आमदार डॉ. संतोष टारफे यांची गाडी अडवण्यात आली.

सिरसम बुद्रूक येथे बंद
सिरसम बुद्रूक ः येथे शेतकऱ्यांनी बंद आंदोलनात सहभाग नोंदवला. सिरसम बुद्रूक येथे परिसरातील चाळीस ते बेचाळीस गावातील शेतकरी एकत्र आले व बंद पाळला.
वसमतमध्ये निवेदन

वसमत ः राज्‍यात शेतकरी आत्‍महत्‍या वाढत असून शेतीमालाला उत्‍पादन खर्चापेक्षा अधिक भाव देण्यात यावा, स्‍वामीनाथन आयोग लागू करावा आदी मागण्यासाठी शेतकऱ्यांनी बंद पाळून निषेधाचे निवेदन दिले. या निवेदनावर ऋषीकेश बर्वे, हरिभाऊ सूर्यवंशी, प्रेमानंद शिंदे, मनोज भालेराव, सदानंद शिंदे, शंकरराव कदम, सतीश जाधव, सतीश देसाई यांच्‍या स्‍वाक्षऱ्या आहेत.

बोराळा पाटीवर आंदोलन
वसमत तालुक्‍यातील बोराळा पाटीवर शेतकऱ्यांनी सकाळी दहा ते बारा रास्‍तारोको आंदोलन केले. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला.

साळवा पाटीवर बसवर दगडफेक
आखाडा बाळापूर ः परिसरातील आखाडा बाळापूर, कांडली फाटा, कामठा फाटा येथे शेतकऱ्यांनी रास्‍तारोको आंदोलन केले. बाळापूर येथील दुकाने पूर्णपणे बंद होती. दोन अडीच तासाच्‍या नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. शहरातील किराणा मार्केट, भुसार मार्केट, कपडा मार्केट यासह लहान मोठी दुकाने बंद होती. तसेच कांडली फाटा ते साळवा फाट्यावर शेकडो वाहने रांगेत अडकली होती. यामध्ये अकोला-अमरावती, अकोला-हैद्राबाद, हिंगोली-नांदेड, मुदखेड- अकोला या बसगाड्या अडकल्‍या होत्‍या. त्‍यासोबतच प्रवाशांची एसटीमध्ये अडकल्‍याने मोठी अडचण झाली. साळवा पाटी येथे एका बसवर दगडफेक झाली. एसटीत अडकलेल्‍या प्रवाशांना थंडपाणी व्यापाऱ्यांनी उपलब्‍ध करून दिले. कांडली फाटा येथे जि.प. सदस्य अजित मगर, डॉ. सतीश पाचपुते, भगवान खंदारे, पंचायत समितीचे गटनेते गोपू पाटील, प्रकाश नरवाडे, सी.डी. पानपट्टे, पिंटू पतंगे, श्रीकांत देशमुख, भाऊसाहेब देशमुख, महेश पानपट्टे, सुशांत पतंगे आदी आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्‍यान, साळवा पाटीजवळ अकोला ते लातूर या बसवर दगड मारून बसचा काच फोडण्यात आला. त्‍यानंतर बसचालकाने बाळापूर पोलिसात तक्रार दिली. मोठ्या प्रमाणात एसटी बसेस अडकल्‍याने प्रवाशांचे हाल झाले.

पांगरा शिंदे येथे मुख्यमंत्र्यांच्‍या पुतळ्याचे दहन
पांगरा शिंदे ः येथील शेतकऱ्यांनी संतप्‍त होवून शासनाचा निषेध केला. तसेच मुख्यमंत्र्यांच्‍या प्रतिकात्‍मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र आले होते

कुरुंद्यात आंदोलन
कुरूंदा ः शेतकऱ्यांच्‍या कर्जमाफीच्‍या आंदोलनासाठी आठवडी बाजार बंद ठेवल्‍यानंतर कुरुंदाचे व्यवहार ठप्‍प झाले. विविध संघटना, व्यापारी व वैद्यकीय व्यावसायिकांनी त्‍यामध्ये सहभाग घेतला. तसेच दुकाने बंद केल्‍याने सर्व व्यवहार ठप्‍प होते. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

नर्सी नामदेव येथे आंदोलन
नर्सी नामदेव ः शेतकरी व व्यापाऱ्यांनी एकत्र येवून संपात सहभाग नोंदवला. बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट होता. आंदोलनात दीपक मोरे, दशरथ मोरे, भिकाजी कदम, बबन सावंत, शाहूराव देशमुख, डॉ. गोपाल बाहेती, किसन बांगर, विश्वनाथ गायकवाड, खलील पठाण, भय्या ठाकूर, शेख रहिम, शिवाजी पोघे, अशोक पवार, दत्ता लांबाडे, राम उफाड, तुळशीराम काकडे, अशोक पवार, वामन दीपके, गोविंद बाहेती, मारोती कदम, बबन मोरे, बंडू नितनवरे, उत्तम पातळे, विठ्ठल वाशिमकर, पांडूरंग मोरे, प्रभाकर चाकोतकर, जगन गुगळे आदी सहभागी झाले होते.

पळसगाव फाट्यावर तीन तास रास्‍तारोको
गिरगाव ः गिरगाव परिसरात पळसगाव फाट्यावर शेतकऱ्यांनी तीन तास रास्‍तारोको आंदोलन केले. रस्‍त्‍यावर बैलगाड्या सोडून रस्‍ता अडवण्यात आला. दुपारी दहा ते एक पर्यंत वाहने ठप्‍प झाली होती. दोन्‍ही बाजूने वाहनांच्‍या रांगा लागल्‍या होत्‍या.

* कळमनुरी तालुक्‍यात तीन बसवर दगडफेक
* गोरेगाव व पांगरा शिंदेमध्ये मुख्यमंत्र्यांच्‍या प्रतिकात्‍मक पुतळ्याचे दहन
* वगरवाडी तांड्यावर रास्‍तारोको आंदोलन
* वसमतमध्ये शेतकरी मोर्चा
* पळसगाव फाट्यावर तीन तास रास्‍तारोको
* जिल्‍हाभरात बाजारपेठ पूर्णपणे ठप्‍प
* भाजप वगळून सर्व पक्षीय नेत्‍यांनी आंदोलन सहभाग
* बैलगाड्या रस्‍त्‍यावर सोडून रस्‍ता अडवला
* अनेक ठिकाणी भाजीपाला व दूध रस्‍त्‍यावर ओतले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com