हिंगोली-नांदेड मार्गावर शेतमाल व दूध टाकून रास्‍तारोको

hingoli kalamnuri
hingoli kalamnuri

कळमनुरी : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी व शेतकऱ्यांच्‍या विविध मागण्यांसंदर्भात शुक्रवारी (ता.2) खानापूर येथे शेतकऱ्यांनी उत्‍स्‍फूर्तपणे शेतकरी संपात सहभाग नोंदवत हिंगोली-नांदेड राष्ट्रीय मार्गावर शेतमाल व दूध टाकून दोन तास रास्‍तारोको आंदोलन केले. शेतकऱ्यांना या आंदोलनापासून परावृत्त करू पाहणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना आंदोलकांच्‍या संतप्‍त भावनांचा सामना करावा लागला.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, स्‍वामीनाथन आयोगाच्‍या शिफारशी लागू कराव्यात, शेती उत्‍पादन खर्चानुसार शेतमालाला भाव देण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी राज्‍यभरात शेतकऱ्यांनी पहिल्‍यांदाच शेतकरी संपाचे हत्‍यार उपसले आहे. विविध ठिकाणी या शेतकरी संपाला प्रतिसाद व पाठिंबा मिळत आहे.

तालुक्‍यातील चिंचोर्डी येथील शेतकऱ्यांनी शेती संपाला पाठिंबा देत प्रत्‍यक्षात संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असताना शुक्रवारी (ता.2) हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर खानापूरजवळ खानापूर, सावरखेडा, इसापूर रमणा, टाकळी आदी गावातील शेतकरी उत्‍स्‍फूर्तपणे एकत्र आले. त्‍यांनी शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी प्रत्‍यक्ष शेतकरी संपात सहभाग नोंदवला. एकत्र आलेल्‍या शेतकऱ्यांनी भेंडी, मिरची, वांगे आदी भाजीपाला, हळद, सोयाबीन, तूर व दूध रस्‍त्‍यावर टाकून अचानकपणे रास्‍तारोको आंदोलन सुरू केले. या आंदोलनात ज्ञानेश्वर जाधव, नितीन देशमुख, राजू इंगळे, बबन जाधव, नवनाथ पवार, सुशांत देशमुख, रामदास चौतमल, सोपानराव जगताप, गणेश शिंदे, शामराव हरण, जनार्दन हरण, राजू इंगळे, श्रीराम जाधव, संजय जाधव, सचिन जाधव यांच्‍यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले. जिल्‍हा परिषद सदस्य विठ्ठल चौतमल व अजित मगर हे आंदोलनस्‍थळी उपस्‍थित झाले.

राष्ट्रीय महामार्गावर अचानक सुरू झालेले रास्‍तारोको आंदोलन पाहता रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूने वाहनांच्‍या शेकडो रांगा लागल्‍या होत्‍या. आंदोलनाची माहिती मिळताच हिंगोली व बासंबा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी आंदोलनस्‍थळी पोहोचले. हे आंदोलन जवळपास दोन तास करण्यात आले. आंदोलनामुळे विस्‍कळीत झालेली वाहतूक पोलिसांनी खटकाळी बायपास व कळमनुरी मार्गावर थांबवून ठेवली हाती. आंदोलन आटोपते घेण्यासंदर्भात सूचना करणाऱ्या पोलिस प्रशासनाच्‍या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संतप्‍त शेतकऱ्यांच्‍या भावनाचा सामना करावा लागला. पोलिस कर्मचारी व शेतकऱ्यांनी या वादात मध्यस्‍थी केल्‍यामुळे हा वाद मिटविण्यात आला. एकंदरीत शेतकऱ्यांनी उत्‍स्‍फूर्तपणे एकत्र येत राष्ट्रीय रस्‍त्‍यावर भाजीपाला दूध टाकून दोन तास रास्‍तारोको करत शेतकऱ्यांच्‍या प्रश्न सोडवण्याची मागणी लावून धरली. त्‍यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले.

येहळेगाव सोळंके येथे शेतकऱ्यांचा रास्‍तारोको
औंढा नागनाथ : तालुक्‍यातील येहळेगाव सोळंके येथे शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता.2) कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी रास्‍तारोको आंदोलन करत शेतमाल रस्‍त्‍यावर टाकला. शेतकऱ्यांच्‍या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी शेतकरी संपामध्ये सहभाग नोंदवला. यामध्ये जिल्‍हा परिषद सदस्य अजित मगर, भीमराव कऱ्हाळे, गजानन सोळंके, ज्ञानेश्वर माऊली, सोपान सोळंके, कैलास सावळे, भारत काळे, पिंटू सोळंके, संजय सोळंके, बाबाराव इंगळे, प्रभाकर सोळंके, भगवान शेळके, संतोष वाघमारे, साहेबराव सावळे, उत्तम मुंदडा यांच्‍यासह शेतकऱ्यांची उपस्‍थिती होती. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्‍या मागण्या पूर्ण झाल्‍या नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असाही इशारा देण्यात आला. हे आंदोलन एक तास करण्यात आले. यामुळे हिंगोली ते परभणी रस्‍त्‍यावरील वाहतूक काही काळ विस्‍कळीत झाली होती. रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूने वाहनांच्‍या रांगा लागल्‍या होत्‍या.

शेतकरी संपाचा परिणाम
औंढा नागनाथ हे ज्‍योतिर्लिंगाचे तिर्थक्षेत्र असून या ठिकाणी भाविकांची वर्दळ असते. ता. 1 जूनपासून शेतकऱ्यांनी सुरू केलेल्‍या आंदोलनामुळे जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. या संपाचा परिणाम येथील आठवडी बाजारावर जाणवला. या संपामुळे आठवडाभर पुरेल एवढा भाजीपाला महिलांनी खरेदी करण्यात आला. भाजीपाल्‍यांची आवकही कमी झाली होती. तसेच दुध पाकिटाची वाहने आले नसल्‍यामुळे नागरिकांना दुधापासून वंचित रहावे लागले. याशिवाय ज्‍योतिर्लिंग नागनाथाच्‍या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अभिषेकासाठी दूध उपलब्‍ध झाले नसल्‍याचे दुकानदारांनी सांगितले. भाविकांची श्रद्धा असल्‍याने थोडे का होईना दूध उपलब्‍ध करून देण्याची विनंती पुरोहितांकडे करत असल्‍याचे चित्र मंदिर परिसरात होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com