गुटखा, देशीदारुची अवैध विक्री रोखण्यात यंत्रणेला अपयश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

जिल्हाभरात अवैध गुटखा विक्री व देशीदारुची बेकायदेशीर विक्रीला ऊत आला असून उत्पादन शुल्क खाते व अन्न व औषध खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे हे गैरप्रकार वाढत चालले आहेत.

हिंगोली - जिल्हाभरात अवैध गुटखा विक्री व देशीदारुची बेकायदेशीर विक्रीला ऊत आला असून उत्पादन शुल्क खाते व अन्न व औषध खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे हे गैरप्रकार वाढत चालले आहेत.

जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात गुटखा विक्रीला उधाण आले आहे. जिल्ह्यातील कोणत्याही पानटपरीवर शासनाने बंदी घातलेला गुटखा सहज मिळू लागला आहे. आंध्रप्रदेशातून मराठवाड्याच्या विविध जिल्हयातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक केली जात आहे. हिंगोली तालुक्‍यात सिरसम बुद्रूक सारख्या आठवडी बाजाराच्या ठिकाणी पाच ते सात लाख रुपयांचा गुटखा मागील चोवीस तासात पोलिसांनी पकडला. यापूर्वी मागील पंधरवाड्यात हैद्राबादहून औरंगाबादच्या दिशेने जाणारा पंचवीस लाख रुपयांच गुटखा औंढा पोलिसांनी पकडला. प्रत्यक्षात गुटखा विक्रीमधील गैरप्रकार रोखण्यासाठी अन्न व औषध खात्याने कारवाई करणे आवश्‍यक आहे. पण खात्याचे हिंगोलीला कार्यालय नाही. तसेच परभणीहून नियंत्रण ठेवणे कठीण होते. त्यामुळे केवळ पोलिस पकडतील तेवढ्याच्या कारवायाच्या नोंदी केल्या जात आहेत. खात्याचे कार्यालय नसल्यामुळे उघडपणे कोणत्याही पानपट्टीवर शासनाने बंदी घातलेला गुटखा उपलब्ध होत आहे.

दुसरीकडे देशीदारुच्या अवैध विक्रीचा प्रश्न गंभीर झाला आहे. रस्त्यालगत असलेल्या बारवर बंदी घातल्यानंतर देशीदारुची विक्री संकटात सापडली होती. मोठ्या प्रमाणात दुकाने बंद झाली, मात्र त्यासोबत अवैध विक्री जोरात सुरु झाली. अवैध विक्री सुरु झाल्यानंतर उत्पादन शुल्क खात्याने या प्रकरणी कोणतीच कारवाई केली नाही. उलट पोलिसांनीच काही किरकोळ कारावाया केल्या तेव्हा या प्रकारावरून उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खात्याच्या अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. एवढेच नव्हे तर त्यांच्या दौऱ्यानंतर तीनच दिवसात अधीक्षकांची बदली केली. मात्र तरीही खात्याने अजूनही दारुच्या अवैध विक्रीला आवर घातला नाही. त्यामुळे हे गैरप्रकार अजूनही सुरु आहेत.

Web Title: hingoli news marathi news maharashtra news