नांदेड ते अजनी रेल्‍वे पुन्हा दर सोमवारी धावणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 जून 2017

प्रवाशांच्या अल्‍प प्रतिसादाचा कारण पुढे करून तसेच प्रवाशांच्या वाढत्या गर्दीकडे देखील दुर्लक्ष करून (ता.1) मे पासून या रेल्‍वेगाडीच्या उर्वरित फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. रेल्‍वे प्रशासनाच्या या निर्णया विरोधात हिंगोली येथील गणेश साहु यांच्यासह प्रवाशांनी रेल्‍वेमंत्री सुरेश प्रभु यांच्याकडे निवेदन देवून ही गाडी पुन्हा सुरू करावी अशी मागणी केली होती

हिंगोली, ता. 4 (बातमीदार) ः उन्हाळी हंगामासाठी विशेष सुरू झालेली नांदेड ते अजनी ही रेल्‍वे ठरावीक कालावधीसाठी पुर्णा ते अकोला रेल्‍वे मार्गाने सुरू झाली होती. मात्र या वाढलेली गर्दी व प्रवाशाच्या मागणीमुळे ही गाडी यापुढे देखील सुरू राहणार आहे.

खास उन्हाळी हंगामासाठी नांदेड ते अजनी ही साप्ताहिक विशेष गाडी (ता.20) मार्च पासून पुर्णा ते अकोला या मार्गाने सुरू करण्यात आली होती. मात्र पाच तासाच्या अंतराने सलग तीन रेल्‍वेगाड्या पुर्णा अकोला मार्गाने धावत असल्याने हिंगोली येथील प्रवाशांच्या मागणीमुळे (ता.17) एप्रील पासून रेल्‍वेचे वेळापत्रक बदलण्यात आले होते.

प्रवाशांच्या अल्‍प प्रतिसादाचा कारण पुढे करून तसेच प्रवाशांच्या वाढत्या गर्दीकडे देखील दुर्लक्ष करून (ता.1) मे पासून या रेल्‍वेगाडीच्या उर्वरित फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. रेल्‍वे प्रशासनाच्या या निर्णया विरोधात हिंगोली येथील गणेश साहु यांच्यासह प्रवाशांनी रेल्‍वेमंत्री सुरेश प्रभु यांच्याकडे निवेदन देवून ही गाडी पुन्हा सुरू करावी अशी मागणी केली होती.

ही मागणी रेल्‍वे प्रशासनाने मंजुर केल्यामुळे नांदेड ते अजनी ही गाडी पुन्हा दर सोमवारी धावणार आहे. तसेच या मार्गावर नागपूर-औरंगाबाद, तिरूपती, कोल्‍हापूर, पुणे, अजमेर, बिकानेर, अमृतसर, इंदौर, या धावणाऱ्या गाड्याच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी देखील रेल्‍वेमंत्र्याकडे करण्यात आली आहे.

या मार्गावरून धावणाऱ्या नांदेड ते अजनी या गाडीच्या या महिण्यात आठ फेऱ्या पुर्ण होणार आहेत. त्‍याचे आरक्षण सुरू आहे. हिंगोली ते अजनीसाठी जनरल डब्यासाठी 125, स्‍लीपर क्‍लाससाठी 370, एसीटूसाठी 1395, एसीथ्री 1015 रुपयाचे भाडे आकारण्यात आल्याचे स्‍टेशन मास्‍टर भीमचरण सोरेने यांनी सांगितले.

ही गाडी नांदेड येथून दर सोमवारी रात्री साडेआठ वाजता निघुन पुर्णा येथे रात्री नऊ वाजता, वसमत येथे 9.35, हिंगोली रात्री 12.45, त्‍यानंतर ही गाडी पुढे मुर्तीजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, वर्धा मार्गे मंगळवारी अजनी येथे सकाळी 5.25 वाजता पोहचणार आहे.

परतीच्या प्रवासात ही गाडी दर मंगळवारी अजनी येथुन रात्री 10.20 वाजता सुटणार असून ती याच मार्गाने अकोला येथे रात्री 2.50 वाजता, वाशीम येथे सकाळी 4.15 वाजता, हिंगोली सकाळी 5.14 वाजता वसमत येथे 6.25, पुर्णा सकाळी 7.10 तर नांदेड येथे बुधवारी सकाळी 9.15 वाजता पोहचणार आहे.

या गाडीचा प्रवाशांची लाभ घेण्याचे आवाहन प्रवासी संघटनेचे अध्यक्ष धरमचंद बडेरा, जेठानंद नेनवाणी, गणेश साहु, राकेश भट्ट, नंदकिशोर तोष्णीवाल, शोएब वासेसा, माया साहु आदीनी केले आहे.

Web Title: Hingoli News: Nanded-Ajani Railway Service to resume again