हिंगोली : पाचवीपासुन सुरु होणाऱ्या शाळेत पाल्याला पाठविण्यासाठी पालक द्विधा मनस्थितीत

राजेश दारव्हेकर
Tuesday, 19 January 2021

जिल्ह्यात  नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. शाळा सुरु होण्यापूर्वी  शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या

हिंगोली : जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य आहे. आता ता. २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. पाल्याला शाळेत पाठवावे किंवा नाही या द्विधा मनस्थितीत पालक आहेत.

जिल्ह्यात  नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. शाळा सुरु होण्यापूर्वी  शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्यात ८० शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते त्यानंतर हिंगोली तालुक्यातील  नर्सी येथे शाळा सुरु झाल्यावर एक शिक्षक बाधित आढळला होता . त्यानंतर सर्व शिक्षक व विद्याथ्यांची तपासणी केली. या वर्गात शिक्षण घेणारे विद्यार्थी वयाने मोठे असल्याने पालकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता पाचवीपासूनच्या शाळा सुरू होणार असल्याने पालक द्विधा मनस्थितीत आहेत. मुलाचे वय कमी असल्याने त्यांना समज नसल्याचे पालक सांगत आहेत. 

हेही वाचा - हिंगोलीत राधा जिनिंगला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांच्या कापसाचे नुकसान

काही पालक मात्र शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करीत असून, यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे सांगत आहेत. याबाबत शिक्षण विभागानेही आदेश काढण्याची तयारी सुरू केली असून, सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यास सांगण्यात आले आहे. दोन हजार ८०० शिक्षक यासाठी लागणार असल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगितले जात आहे.

जिल्ह्यात पाचवी ते आठविच्या ६२९ शाळा आहेत तर पाचवी ते आठवीची विद्यार्थी संख्या जवळपास ८२ हजार ९५१ आहे.

शासनाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठविचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची तयारी सुरू आहे. शासनाने केलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार शाळा सुरू केल्या जातील.

- संदीप सोनटक्के, शिक्षणाधिकारी

 नववी पासून मुले समजदार असल्याने हे वर्ग सुरू झाल्याने चांगले झाले आहे. मात्र पाचविची मुले लहान असल्याने त्यात काही शाळेतील शिक्षक बाधित असल्याने पाल्याला शाळेत पाठवावेत किंवा नाही अशी द्विधा मनस्थिती पालकात आहे.

- गणेश खंडागळे, पालक

 

संपादन-  प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Parents are in a parrents to send their children to school starting from 5th standard nanded news