Hingoli : रेल्वे रोको आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway

Hingoli : रेल्वे रोको आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंगोली : रेल्वेच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा रेल्वे संघर्ष समितीतर्फे बुधवारी (ता.२३) रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. यास जनतेतून मोठा प्रतिसाद मिळाला. आंदोलनकर्त्यांनी तिरुपती- अमरावती ही रेल्वे अडविली होती. या प्रकरणी १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हिंगोली जिल्हा रेल्वे संघर्ष समितीतर्फे ७ नोव्हेंबर रोजी प्रशासनाला एक निवेदन देऊन रेल्वे संदर्भात काही मागण्या करण्यात आल्या होत्या. या आंदोलनाची ठिणगी जालना- छपरा एक्स्प्रेसमुळे पडली होती. जालना येथून बिहार राज्यातील छपरा स्टेशन करिता पूर्णा- अकोला मार्गे जाहीर करण्यात आलेली ‘छपरा एक्स्प्रेस’ ऐन वेळेवर जालना, औरंगाबाद, मनमाड मार्गे सुरू करण्यात आली. या रेल्वेच्या शुभारंभ प्रसंगी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाषणातून सांगितले की, ही रेल्वे अकोला मार्गे जाणार होती. परंतु, खूप प्रयत्न करून ही रेल्वे मनमाड मार्गे वळविण्यात आली आहे. रावसाहेब दानवे यांच्या भाषणाची चित्रफीत व्हायरल होताच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली व विदर्भातील वाशीम, अकोला या जिल्ह्यांमध्ये मोठा रोष पसरला.

आंदोलनकर्त्यांनी बुधवारी वाजत- गाजत शहरातून फेरी काढली. नंतर रेल्वे स्थानकात प्रवेश करू इच्छिणाऱ्या आंदोलकांना रेल्वे पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडविले. यावेळी रेल्वे पोलिसचे वरिष्ठ अधिकारी आंदोलकांशी चर्चा करीत होते. इतक्यात अनेक आंदोलकांनी रेल्वे स्थानकाबाहेरून रेल्वे पुलाकडे जाऊन रेल्वे रुळावर ठिय्या आंदोलन सुरू केले. सव्वा अकराच्या सुमारास तिरुपती- अमरावती रेल्वे हिंगोली स्थानकात दाखल झाली. या रेल्वेच्या इंजिनावर चढून आंदोलकांनी घोषणा दिल्या. जवळपास अर्धा तास ही रेल्वे स्थानकातच अडविण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी नांदेड येथील सहाय्यक सुरक्षा आयुक्त बी. दासगुप्ता यांनी पुढाकार घेतला. संघर्ष समितीतर्फे दिलेले निवेदन स्वीकारून तातडीने ही माहिती रेल्वेबोर्ड व रेल्वे मंत्रालयाला कळविण्याचे आश्वासन दासगुप्ता यांनी दिले.

या आंदोलनास सर्वस्तरातून मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील व्यापारी, पत्रकार, जिल्हा वकील संघाचे प्रतिनिधी, जैन संघटना, शिवसेना (ठाकरे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, समाजवादी पक्ष, वंचित बहुजन पक्ष, विराट राष्ट्रीय लोकमंच, रेल्वे हमाल संघटना, बागवान बिरादरी सहित विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला होता. विशेष म्हणजे पुणे येथील महाराष्ट्र जनहित प्रतिष्ठानचे हेमंत ढमढेरे, अशोक राऊत, संजय शेवते, अनिल मोरे, हर्षल घोगलदरे यांनीही सहभाग घेतला. वाशीम जिल्हा रेल्वे संघर्ष समितीतर्फे जुगलकिशोर कोठारी, चंद्रशेखर राठी, विक्की गंभीर मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे प्रा. सुरेश नाईकवाडे उपस्थित होते.