शिवसेनेचा हिंगोलीत नवा सरदार कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena

शिवसेनेचा हिंगोलीत नवा सरदार कोण?

हिंगोली : बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी अचानक शिंदे गटात सहभागी होऊन सर्वांनाच धक्का दिला. शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने मतदान करत बांगर यांनी अखेर बंडाचा झेंडा हाती घेतलाच. आता हिंगोलीत शिवसेना जिल्हाप्रमुख पद कोणाला मिळणार व नवा सरदार कोण होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यासाठी अनेकांनी फिल्डिंगदेखील लावली आहे.

हिंगोलीचे जिल्हाप्रमुख राहिलेले बांगर आक्रमक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या या भिडस्त स्वभावामुळेच जिल्ह्यात शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षनेतृत्वाने त्यांना कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि ते आमदार झाले. पण, अडीच वर्षांतच त्यांनी बंडखोरांचे नेतृत्व स्वीकारले. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का होता, त्याहीपेक्षा तो हिंगोलीवासीयांसाठी होता, ज्यांनी दोनच दिवसांपूर्वी बांगर यांचा कट्टर, एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून सत्कार केला होता. आता बांगर यांच्या बंडखोरीनंतर त्यांना तोडीसतोड असे नेतृत्व शिवसेनेला शोधावे लागणार आहे.

जिल्ह्यातील राजकारणाला बांगर यांच्या बंडाने कलाटणी मिळाली असली तरी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवणारा मोठा शिवसेनेचा वर्ग आहे. त्या जोरावर आता नवा सरदार म्हणजे जिल्हाप्रमुख नेमून शिवसेनेची नव्याने बांधणी करण्याचे आवाहन नेत्यांसमोर असणार आहे.

जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलणार आहेत. हिंगोली जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात शिवसेनेचा एक खासदार, एक आमदार, औंढा व सेनगाव येथील नगरपंचायत तसेच जिल्हा परिषदेत देखील शिवसेनेचे अध्यक्ष होते. वसमत व कळमनुरी नगरपालिकाही शिवसेनेकडे होती. दरम्यान, बांगर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हात धरला असल्याने सेनेत दोन गट पडले आहेत.

जिल्ह्यात कळमनुरी विधानसभा मतदारसंघ युतीच्या काळात सेनेकडे तर वसमत व हिंगोली विधानसभा भाजपकडे होती. कळमनुरीत संतोष बांगर यांनी विजय मिळवून हा मतदारसंघ सेनेच्या ताब्यात आणला. तसेच त्यांच्याकडे शिवसेना जिल्हाप्रमुख पद देखील होते.

हे आहेत दावेदार

आता नवीन जिल्हाप्रमुख पदासाठी आपलीच वर्णी लागावी, यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. यासाठी शिवसेनेचे माजीमंत्री डॉ. जयप्रकाश मुदंडा यांच्या समर्थकांनी नुकतीच बैठक घेऊन त्यांना जिल्हाप्रमुख करावे, अशी मागणी केली आहे. तसेच डॉ. मुदंडा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी समर्थकांसह मुंबई येथे रवाना झाले आहेत. यासह सुनील काळे, परमेश्वर मांडगे, संदेश देशमुख, बाळासाहेब मगर हेदेखील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचे दावेदार मानले जात आहेत.

Web Title: Hingoli Shiv Sena New Leader Fielded

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..