
Hingoli : ST bus मध्ये महिलांसाठी ५० टक्के सवलत, मात्र सुविधांचे काय?
हिंगोली : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष २०२३-२४ साठी सादर केलेला अर्थसंकल्प महिलांना सक्षम करणारा आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त करतानाच काही महिलांनी मात्र अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे नमूद केले. महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सूट देण्याची घोषणा तशी चांगली. परंतु, लालपरीच्या दुरवस्थेच्या विळख्यात आहे, त्याचे काय? असा उलट प्रश्न महिलांनी केला.
एसटीतील सुविधा सुधारण्याची गरज असल्याचे महिलांनी व्यक्त केले. त्यातच शहरी भागात नोकरी करण्यास आलेल्या महिलांसाठी ५० वसतिगृहांची निर्मिती, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला योजनेला एकत्र करून ‘शक्तीसदन’ योजनेची घोषणा केली. परंतु, या योजनेची अंमलबजावणी योग्यरीतीने व्हावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. नोकरपेशा महिलांसाठी सुखावणारा असला तरी कष्टकरी महिलांसाठी हा अर्थसंकल्प निराशजनक आहे.
एसटी बस प्रवासामध्ये महिलांना ५० टक्के सूट देऊन वित्तमंत्री फडणवीस यांनी गरीब व गरजू महिलांना मोठा दिलासा दिला आहे. मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडली योजना आता नव्या रूपामध्ये आहे. यातून गरीब कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे. महिलांना आर्थिक पाठबळ मिळावे याकरिता बचत गटांच्या महिलांसाठी पणन केंद्र ही बाब महत्त्वाची आहे.
- विद्या पवार, सामाजिक कार्यकर्त्या.
अर्थसंकल्पात महिलांना एसटी प्रवासासाठी ५० टक्के सवलत दिली. मात्र, त्यापूर्वी एसटी गाड्यांच्या दुरवस्थेवर सरकारने नजर टाकावी. ही दुरवस्था दूर करण्यासाठी सरकारने आधी पावले उचलावी; तसेच महिलांच्या राखीव जागेत वाढ करावी. तेव्हाच महिला एसटीतून प्रवास करतील. अन्यथा या सवलती केवळ कागदाची शोभा वाढवण्यासारख्याच आहे.
- संगीता महाजन
सरकारने महिलांचा नेहमीच सन्मान केला. बसच्या भाड्यात ५० टक्के सवलत देऊन महिलांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. त्यामुळे नोकरी, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी व गरजू महिलांना याचा नक्कीच लाभ मिळेल. याशिवाय मुलींचा सक्षमीकरणाकरिता लेक लाडली योजना आता नव्या रूपामध्ये आहे. त्यामुळे गरीब कुटुंबांना त्याचा लाभ मिळेल.
- वनिता शेळके