हिंगोली : लॉकडाऊन काळात पाच महिन्यात वीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दहा पात्र, आठ प्रलंबित

राजेश दारव्हेकर
Wednesday, 16 September 2020

जिल्ह्यात मागील वर्षी देखील दुष्काळ, सततचा पाऊस यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. काही शेतकऱ्यांनी नापिकीला ,तर काहींनी बँकेकडे असलेले कर्ज कसे फेडावे या विविंचनेत शेतकरी सापडले होते. तसेच शेतमालाला देखील योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले होते.

 

हिंगोली : जिल्ह्यात लॉकडाऊन काळातील एप्रिल ते ऑगस्ट या दरम्यान एकूण वीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यामध्ये दहा पात्र, दोन अपात्र, तर आठ जणांचा अहवाल प्रलंबित असल्याने येणाऱ्या २१ सप्टेंबरच्या बैठकीत प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेतली जाणार आहे.

जिल्ह्यात मागील वर्षी देखील दुष्काळ, सततचा पाऊस यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. काही शेतकऱ्यांनी नापिकीला ,तर काहींनी बँकेकडे असलेले कर्ज कसे फेडावे या विविंचनेत शेतकरी सापडले होते. तसेच शेतमालाला देखील योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले होते. शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले असताना पुन्हा मार्च महिन्यात अख्या जगात कोरोना विषाणूने थैमान घातल्याने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने पुन्हा शेतकऱ्यावर आभाळ कोसळ ल्यासारखे झाले. लॉकडाऊन लागू केल्याने शेतातील कामे कसे करावे तर आलेला शेतमाल विक्री कसा करावा असा दुहेरी प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता.

हाता तोंडाचा आलेला घास अस्मानी संकटाने हिरावल्याने

मागील दोन वर्षापासून जिल्ह्यात अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचा पिच्छा सोडला नाही, पिके ऐन भरात असताना अवकाळी पावसाने दगा दिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर सोयाबीन, तूर, पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने आणखीनच डोखेदुखी वाढली होती. हाता तोंडाचा आलेला घास अस्मानी संकटाने हिरावल्याने शेतकरी पुरता संकटात सापडला होता .बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे ,तर पीक नुकसानीचे केलेले पंचनाम्याची मदत देखील लवकर हातात पडत नाही. त्यामुळे हताश होऊन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

हेही वाचाअशोक चव्हाण म्हणाले, काळजी घ्या...काहीही कमी पडू देणार नाही

मे महिन्यात सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या

मागील पाच महिन्यात वीस शेतकऱ्यांनी नापिकी , कर्जाची परतफेड , सावकाराचा तगादा , शासनाकडून आर्थिक मदत मिळत नाही,नुकसान भरपाई, शेतातील पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने मृत्यूला कवटाळले आहे.एप्रिल मध्ये दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या त्यापैकी एका आत्महत्याग्रस्त शेतकाऱ्यांच्या कुटुंबियाला आर्थिक मदत मिळाली असून एक अपात्र ठरला आहे. मे महिन्यात सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, यामध्ये सात आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली .जून मध्ये पाच शेतकऱ्या पैकी दोघे पात्र तर एक अपात्र असून दोघांचा अहवाल प्रलंबित ठेवण्यात आला आहे. जुलै महिन्यात पाच शेतकऱ्या पैकी पाच जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. ऑगस्ट मध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती यामध्ये एक अहवाल प्रलंबित ठेवण्यात आला आहे. असे एकूण पाच महिन्यात वीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासन दरबारी घेतली आहे.

शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे

दरम्यान, यंदा देखील  मृगनक्षत्रात पाऊस वेळेवर पडल्याने पेरण्या ही लवकर झाल्या. पिके ही जोमाने वाढत असताना सोयाबीन, कापूस, हळद आदी पिके बहरात असताना पुन्हा ऑगस्ट महिन्यात जोरदार अतिवृष्टी होऊन नदी, ओढ्याचे पाणी नदीकाठच्या शेतात शिरल्याने उभी पिके आडवी झाली तर शेतात पाणी साचल्याने चक्क सोयाबीन पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले असून पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्यात असताना पुन्हा मागील काही दिवसांपूर्वी पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावल्याने हाता तोंडाशी आलेली पिके पुन्हा भुईसपाट झाल्याने शेतकरी संकटात सापडला असल्याचे चित्र आहे. तसेच सोयाबीन , कापूस पिकावर प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना ऐन लॉकडाऊन काळात महागडी औषधी फवारण्याची वेळ आली असून, त्यातच पुन्हा कोरोना संसर्ग देखील वर तोंड काढल्याने शेतकऱ्यांना कुठे जाता येत नाही. यंदा मूग, उडीद अतिवृष्टीत गेले असून, जमिनी खरडल्या आहेत. शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जाला, नापिकीला कंटाळून आत्महत्या करीत आहेत. वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने, प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन वेळेवर पीककर्ज, नुकसान भरपाई दिल्यास शेतकरी आत्महत्ये पासून दूर राहील.

येथे क्लिक करा - Video - शालेय शिक्षणमंत्र्यांनी घेतला नांदेडमध्ये आढावा... -

प्रलंबित प्रकरणाचा निपटारा केला जाणार

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची आठ प्रकरणे प्रलंबित असून, संबंधित अधिकाऱ्याकडून अहवाल मागविला आहे. येत्या (ता.२१) सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय समितीची बैठक बोलावली असून, या बैठकीत प्रलंबित प्रकरणाचा निपटारा केला जाणार आहे.

चंद्रकांत सुर्यवंशी- निवासी उपजिल्हाधिकारी, हिंगोली.

संपादन - प्र्लहाद कांबळे

ReplyForward

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Twenty farmers committed suicide in five months during lockdown, ten eligible, eight pending hingoli news