Hingoli : वसमत तालुक्यात दुबार पेरणीचे संकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli

Hingoli : वसमत तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

वसमत : तालुक्यातील आठ गावांना पावसाने शुक्रवारी रात्री अक्षरशः झोडपून काढले आहे. अवघ्या पाच ते सहा तासांमध्ये कुरुंदा मंडळामध्ये तब्बल १७९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. याचा सुमारे आठ ते दहा गावांना फटका बसला आहे. अनेक शेतांमधील पिकेही वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.

वसमत तालुक्यामध्ये सुमारे ३० ते ४० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त हळद व सोयाबीन पिकाचे क्षेत्र आहे. आता परिसरामध्ये मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. असे असतानाच शुक्रवारी मध्यरात्रीपासून वसमत तालुक्यात जोरदार पाऊस पडला. विशेषतः कुरुंदा आंबा व गिरगाव मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने नदी नाल्यांना पूर आला. तालुक्यातील पूर परिस्थितीबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

तालुक्यातील टाकळगाव येथे दोन कुटुंब शेतात अडकून पडले असून, त्यांना काढण्यासाठी नांदेड येथील पथक बोलावण्यात आले होते. याशिवाय गावात पाणी साचलेल्या ठिकाणी अनुचित प्रकार होऊ नये, यामुळे प्रशासनाने गावकऱ्यांचे स्थलांतर सुरू केले आहे. तसेच सकाळपासूनच उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्यासह महसूल विभागाची पथके तालुक्यातील अतिवृष्टी भागात ठाण मांडून आहेत. दुपारनंतर पुराचे पाणी ओसरल्यानंतर गावात नुकसानीची माहिती घेण्यास सुरुवात झाली होती. अद्यापपर्यंत नुकसानीचा आकडा कळाला नसला तरी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लोकप्रतिनिधींच्या भेटी

राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे, भाजपचे ज्येष्ठ नेते ॲड. शिवाजीराव जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू चापके यांनी सकाळपासून सर्व गावांना भेटी देऊन नागरिकांना धीर देण्याचे काम केले, सर्वतोपरी मदत करण्याचेही आश्वासन दिले आहे.

परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. नुकसानीची पाहणी करण्याचे काम सुरू आहे, नुकसानीचा अंतिम आकडा दोन दिवसांत कळेल, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आम्ही तुमच्या सोबत आहोत.

-अरविंद बोळंगे, तहसीलदार, वसमत

Web Title: Hingoli Wasmat Taluka Crisis Double Sowing

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..