हिंगोली : हिरवळीसाठी झटणारे ‘झाडावाले गुरुजी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरणप्रेमी

हिंगोली : हिरवळीसाठी झटणारे ‘झाडावाले गुरुजी’

हिंगोली : पावसाळा जवळ आला की अनेकांची पावलं नर्सरीकडे वळतात. पर्यावरणप्रेमी या दिवसांमध्ये रोपं खरेदी करून आपल्या अंगणात, रस्त्याच्या कडेला, पटांगणात किंवा डोंगरमाथ्यावर लावतात. पण, शिक्षक अण्णा जगताप पावसाळाच नव्हे तीनही ऋतूत वृक्षारोपणासाठी आग्रही आहेत. त्या दिशेने ते कृतीही करून विविध प्रकारच्या बियांचे मोफत वाटप करीत आहेत. अनेक वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. त्यामुळेच झाडावाले गुरुजी म्हणून त्यांची नवी ओळख निर्माण झाली आहे.

जयभारत विद्यालय जवळा बुद्रुक (ता. सेनगाव) येथे शिक्षक असलेले जगताप यांना जणू निसर्ग संवर्धनाने झपाटले आहे. त्यासाठी त्यांनी ‘एक मुल तीस झाडे’ हा उपक्रम हाती घेतला आहे. सण, राष्ट्रीय सण आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाला स्वतः वृक्षारोपण करतात. विद्यार्थ्‍यांनाही त्याचे महत्त्व सांगून त्यांच्याकडून ते करून घेतात. लग्नात किंवा इतर कार्यक्रमात रोपटेच भेट म्हणून देतात. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थ्यांची निसर्ग शाळा भरवतात. यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन झाडे लावण्यासाठी ते प्रेरित करतात. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी सुंदर अशी परसबाग तयार केली. जगताप यांनी आतापर्यंत लाखो बियांचे वाटप केले. सोशल मीडियावर त्यांनी विविध ग्रुप तयार केले. त्याद्वारेही मागेल त्याला ते बिया देतात. वृक्षांचे रोपण कसे करावे, याचेही ते मार्गदर्शन करतात.

झेंडूची फुले अभियान

जगताप हे शेतकऱ्यांसाठी झेंडूची फुले हे अभियान राबवत आहेत. या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून फुलांना स्थानिक पातळीवर योग्य बाजारपेठ मिळवून दिली. दसरा दिवाळीला फुलांची आवक वाढून भाव कमी होतात. मात्र, जगताप यांनी व्हॉट्ॲप ग्रुपच्या माध्यमातून अनेक शेतकरी, शासकीय कर्मचारी, इतर नागरिक यांना जोडून शेतकऱ्यांच्या फुलाला शंभर रुपये भाव मिळवून दिला. याच ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा भाजीपाला, धान्य आदी पिकांनाही त्यांनी बाजारपेठ मिळवून दिली.

Web Title: Hingoli Zadawale Guruji Striving For Greenery

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..