सत्तेसाठी दिग्गजांचा आटापिटा 

राजेश दारव्हेकर 
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

हिंगोली - हिंगोली जिल्हा परिषदेच्या 52 गट व 104 गणांची निवडणूक होत आहे. यामध्ये गटांसाठी 261 तर गणांसाठी 437 उमेदवार रिंगणात आहेत. सध्या प्रचाराचा धूमधडाका सुरू झाला असून प्रचार कार्यालयांच्या उद्‌घाटनांसह गटनिहाय प्रचाराला सुरवात झाली आहे. पक्षाचे प्रमुख नेतेदेखील कामाला लागले आहेत. 

हिंगोली - हिंगोली जिल्हा परिषदेच्या 52 गट व 104 गणांची निवडणूक होत आहे. यामध्ये गटांसाठी 261 तर गणांसाठी 437 उमेदवार रिंगणात आहेत. सध्या प्रचाराचा धूमधडाका सुरू झाला असून प्रचार कार्यालयांच्या उद्‌घाटनांसह गटनिहाय प्रचाराला सुरवात झाली आहे. पक्षाचे प्रमुख नेतेदेखील कामाला लागले आहेत. 

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या उमदेवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 367 उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात भाजपतर्फे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या सेनगाव व औंढा नागनाथ तालुक्‍यात सभा झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील जवळा बाजार येथे सभा झाली. त्यामुळे भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे. इतर पक्षांच्या स्थानिकांनी गट व गणात मतदारांच्या गाठीभेटी व कॉर्नर सभा घेण्यास सुरवात केली आहे. 

निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने कमी कलावधीत प्रचार करावा लागणार आहे. गटातील गावांची संख्या अधिक असल्याने प्रचारासाठी उमेदवारांना कालावधी कमी पडणार आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाल्याने त्यांच्या संयुक्‍त प्रचाराचा कार्यक्रम आखला जात आहे. तर शिवसेनेकडूनही स्टार प्रचारकांच्या सभा घेतल्या जाणार आहेत. माजी खासदार ऍड. शिवाजी माने यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांनी त्यांच्या कळमनुरी तालुक्‍यात भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रात्रंदिवस एक करून प्रचार करणे सुरू केले आहे. त्यांचा भाजपच्या उमेदवारांना कितपत लाभ होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

खासदार ऍड. राजीव सातव, आमदार डॉ. संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांच्यासह आमदार रामराव वडकुते, माजी आमदार जयप्रकाश दांडेगावकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांनीदेखील प्रचाराला सुरवात केली आहे. त्यांनी गटनिहाय प्रचार सुरू केला आहे. शिवसेनेतर्फे आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, माजी आमदार गजानन घुगे, जिल्हाध्यक्ष संतोष बांगर तर भाजपतर्फे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष तानाजी मुटकुळे, हिंगोलीचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रचाराला सुरवात केली आहे. 

सध्या गटातील उमेदवाराच्या प्रचाराचे नारळ फोडणे, कार्यालयाचे उद्‌घाटन करणे, कॉर्नर बैठका, गावोगाव रॅली काढून प्रचाराला सर्वच पक्षांच्या प्रमुखांनी धूमधडाक्‍यात सुरवात केली आहे. काही गटात तिरंगी, चौरंगी, बहुरंगी लढतीचे चित्र आहे. तर कोठे अपक्षांचे पारडे भारी असल्याने पक्षांचे उमेदवार चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

Web Title: hingoli zp politics