पोळा विशेष : गाड्यांचा नव्हे, महागड्या बैलांचा छंद

शेखलाल शेख
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

किशोर दिवटे जिवापाड जपताहेत साडेदहा लाखांचे तीन बैल 

औरंगाबाद - छंद आणि हौसेला कुठलेच मोल नसते. आपल्या छंदापायी अनेक जण खर्च करण्यासाठी मागेपुढे पाहत नाही. असाच महागडे शंकरपटाचे बैल सांभाळण्याचा छंद चिकलठाणा येथील किशोर ज्ञानदेव दिवटे यांना आहे.

त्यांच्याकडे वडिलोपार्जित शंकरपटाचे बैल असल्याने त्यांनी आपल्या वडिलांची ही परंपरा कायम ठेवली. इतकेच नव्हे, तर दुष्काळाशी दोन हात करीत त्यांनी तब्बल साडेदहा लाखांच्या तीन बैलांचा सांभाळ सुरू ठेवला आहे. यामध्ये आठ लाखांची एक बैलजोडी आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे शंकरपट बंद असल्याने त्यांना कित्येक वर्षांपासून बैलजोडीतून एक रुपयाचाही फायदा होत नाही. अशा खर्चिक, संकटाच्या परिस्थितीतही त्यांनी बैलजोडीचा कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सांभाळ केला आहे. 
 
महिन्याला हजारोंचा खर्च 
दिवटे यांच्याकडे सध्या तीन बैल आहेत. यामध्ये शिवा आणि बबल्या ही आठ लाखांची बैल जोडी आहे. "शिवा'ची किंमत साडेतीन लाख तर "बबल्या'ची किंमत साडेचार लाख रुपये आहे. तर "देवा' या बैलाची किंमत अडीच लाख आहे. शंकरपट सुरू असताना देवा या बैलाने त्यांना खूप नावलौकिक मिळवून दिला. त्यामुळे या बैलास ते कधीही विक्री करणार नाहीत. त्यांच्याकडील तिन्ही बैलांचा शंकरपटातील वेग वाऱ्यासारखा आहे. 300 फुटांची धावपट्टी ते सहा ते सात सेकंदांत पार करतात. आता शंकरपट बंद असला तरी या बैलांच्या खुराकवर खर्च कमी झालेला नाही. बैलांच्या देखरेखीवर वर्षाला लाखो रुपयांचा खर्च होतो. या बैलांना उडीद दाळ, खवा, दूध, हिरवा चारा, कडब्यासाठी महिन्याला 20 ते 25 हजार रुपयांचा खर्च होतो. त्यांच्याकडे एक एकर शेती असल्याने यामध्येच घर आणि जनावरांसाठी चारा घेतला जातो. 
 
बालपणापासून शंकरपट बघितले 
किशोर दिवटे हे त्यांच्या वडिलांसोबत कित्येक गावात शंकरपटात जायचे. शंकरपट बघताना त्यांना हा छंद जडला. त्यांच्या घरात अनेक वर्षांपासून अतिशय महागडे बैल शंकरपटासाठी सांभाळण्यात येतात. मागील काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने बैलांचा सांभाळ करण्यासाठी अनेक अडचणी येत आहे. दिवसेंदिवस ऊस आणि कडबा महाग होत असल्याने खर्चही वाढतोय. 
 

पुन्हा एकदा शंकरपट सुरू होईल, अशी मला आशा आहे. नाही झाले तरी माझ्याकडे महागडे बैल कायम राहणार आहेत. त्यासाठी खर्च करण्याचीही माझी तयारी आहे. मी बालपणापासून माझ्या दारासमोर बैलजोडी बघत आलोय.'' 
-किशोर दिवटे, चिकलठाणा, औरंगाबाद 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hobby of bull rearing