जिल्हा कचेरीवर हक्कांसाठी धरणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी (ता.१३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांची लगबग पाहायला मिळाली. महाराष्ट्र राज्य हमाल- मापाडी महामंडळ, तसेच शासकीय धान्य गोदाम हमाल पंचायतीच्या वतीने हमाली मजुरीच्या दरासह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. तर, महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या (लाल बावटा) जिल्हा शाखेनेही धरणे आंदोलनातून आपल्या मागण्या मांडल्या. 
 

विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी (ता.१३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांची लगबग पाहायला मिळाली. महाराष्ट्र राज्य हमाल- मापाडी महामंडळ, तसेच शासकीय धान्य गोदाम हमाल पंचायतीच्या वतीने हमाली मजुरीच्या दरासह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. तर, महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या (लाल बावटा) जिल्हा शाखेनेही धरणे आंदोलनातून आपल्या मागण्या मांडल्या. 
 

हमाली दराने मजुरी द्या
बीड - माथाडी मंडळाने निश्‍चित केलेल्या हमाली दराने मजुरी द्यावी, तसेच मार्च २०१२ पासून महागाई निर्देशांकानुसार मजुरीतील फरक व वाढ देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य हमाल- मापाडी महामंडळ, तसेच शासकीय धान्य गोदाम हमाल पंचायतीच्या वतीने मंगळवारी (ता.१३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

राज्यात अनेक ठिकाणी महागाई निर्देशांकानुसार मजुरीतील फरक, तसेच वाढ रक्कम हमालांना देण्यात आली आहे. याच धर्तीवर बीड जिल्ह्यातही मार्च २०१२ पासून महागाई निर्देशांकानुसार हमालीच्या दरात वाढ देऊन मजुरीतील फरक व मजुरी देण्यात यावी या मागणीसाठी महामंडळाच्या वतीने संघटनेचे राजकुमार घायाळ, शेरजमाखाँ पठाण,  रामभाऊ बादाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी मारुती इंगळे, छगन पवार, बाबासाहेब शिंदे, धुराजी कांबळे, बप्पासाहेब जाधव, विठ्ठल धपाटे, ज्ञानोबा मुंडे, शेख मुजम्मिल, विजय वराट यांच्यासह शासकीय धान्य गोदामातील हमाल सहभागी झाले होते.

किमान वेतन, विमा द्या - शेतमजूर युनियनची मागणी
बीड - शेतमजुरांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, तसेच सामाजिक सुरक्षा, किमान वेतन, विमा, पेन्शन आदी लाभ देण्यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या (लाल बावटा) जिल्हा शाखेने मंगळवारी (ता.१३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. 

शेतमजुरांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्यांना सामाजिक सुरक्षा, किमान वेतन, विमा, पेन्शन आदी लाभ द्यावेत, अन्न सुरक्षा योजनेतील धान्य या महिन्यात १५ टक्के कमी मिळाले आहे. अन्नधान्य वाटपात कोणतीही कपात करू नये, शेतकऱ्यांचे राशन या महिन्यात मिळालेले नसून ते त्वरित वाटप करावे, धारूर ‘क’ वर्ग नगरपालिका अंतर्गत झालेल्या रोहयो कामांचे १४ मे ते ९ जून या काळातील थकीत वेतन त्वरित वाटप करून कामावर अपघाती दुखापत झालेल्या मजुराला त्वरित नुकसान भरपाई द्यावी, मग्रारोहयोतून सार्वजनिक स्वरूपाची कामे जिल्ह्यात तत्काळ सुरू करावीत, सरकारने घोषित केल्याप्रमाणे निराधार व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांसाठी दरमहा हजार रुपये पेन्शन वाटपाची अंमलबजावणी करावी, श्रावणबाळ, तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या नवीन लाभार्थ्यांसाठी  उत्पन्न मर्यादा पन्नास हजार करून ज्या कुटुंबाचे उत्पन्न पन्नास हजारांपर्यंत आहे अशा कुटुंबाला या योजनेचा लाभ द्यावा, निराधार समितीच्या बैठका नियमित घ्याव्यात आदी मागण्यांसाठी शेतमजूर युनियनने संघटनेचे अध्यक्ष सुदाम शिंदे, तसेच सचिव सय्यद रज्जाक यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले.

Web Title: Hold rights to the district headquarters