होमगार्डच्या 500 पदांसाठी 2,500 पदव्युत्तर उमेदवार  

औरंगाबाद : राज्य राखीव पोलिस बल सातारा परिसर येथे गुरुवारी होमगार्ड भरतीदरम्यान मैदानी चाचणीवेळी भोवळ आलेली महिला उमेदवार.
औरंगाबाद : राज्य राखीव पोलिस बल सातारा परिसर येथे गुरुवारी होमगार्ड भरतीदरम्यान मैदानी चाचणीवेळी भोवळ आलेली महिला उमेदवार.

औरंगाबाद - जिल्ह्यात रिक्त होमगार्डच्या 545 जागांसाठी गुरुवारी (ता. सात) पोलिस आयुक्तालय तसेच राज्य राखीव पोलिस बल, सातारा येथील मैदानांवर भरती प्रक्रिया सुरू झाली. दहावीची पात्रता असताना पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारांची मोठी संख्या या भरतीत होती. 

औरंगाबाद जिल्ह्यातील सात तालुक्‍यांत होमगार्डची एक हजार 550 पदे मंजूर आहेत. त्यात 545 पदे रिक्त असून, येत्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रिक्त पदांची भरती केली जात आहे. या पदासाठी दोन हजार 573 उमेदवारांचे अर्ज पोलिस आयुक्तालयाला प्राप्त झाले होते. त्यानुसार गुरुवारी सुरू झालेल्या भरतीत सकाळपासून औरंगाबादसह जालना, अहमदनगर, बीड, परभणी, लातूर येथून उमेदवार आले. पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर कागदपत्रांची पडताळणी व काही मैदानी स्पर्धा; तसेच राज्य राखीव पोलिस बल सातारा परिसर येथे उमेदवारांच्या धावण्याची व अन्य मैदानी चाचण्या घेण्यात आल्या. दोन दिवसांत पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी, धावणे, गोळाफेक अशा स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. भरती प्रक्रियेदरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या मैदानावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामध्ये दोन सहायक पोलिस आयुक्त, पाच निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, तसेच तीनशे पोलिस कर्मचारी असा बंदोबस्त होता. 
 
दिवसाला साडेचारशे रुपये मानधन 
होमगार्डना बंदोबस्तादरम्यान दरदिवशी साडेचारशे रुपये मानधन दिले जाणार आहे. होमगार्ड म्हणून सलग तीन वर्षे सेवा केल्यानंतर त्यांना पोलिस भरतीत पाच टक्के आरक्षण दिले जाईल. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर भरती प्रक्रिया वेगाने केली जात आहे. 
 
उलट्यांचा त्रास 
होमगार्ड भरतीसाठी आलेल्या महिला उमेदवारांपैकी काहींना धावताना त्रास जाणवला. काही महिला उमेदवारांना धावताना भोवळ; तर काहींना अस्वस्थ वाटत होते. उलट्यांचाही त्रास झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com