चक्क खड्डे बुजविण्यासाठी जिंतूरला ‘होम हवन’ 

राजाभाऊ नगरकर 
Sunday, 25 October 2020

जिंतूर शहरातून जाणाऱ्या औरंगाबाद-औंढा या राज्य महामार्गावरचे खड्डे बुजविण्यासाठी संबंधित बांधकाम विभागाला साकडे घालत मार्गावरील खड्ड्यात विधीवत होमहवन करून संभाजी ब्रिगेडने दसऱ्याच्या दिवशी रविवारी आंदोलन केले. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची शहरात एकच चर्चा रंगली होती.

जिंतूर ः साडेतीन मुहूर्तापैकी दसरा एक मुहूर्त आहे. या शुभ मुहूर्तावर नागरिक आपापल्या आर्थिक क्षमतेनुसार जमीन, घर, दागिने, कपडालत्ता,चैनीच्या वस्तू, वाहन यापैकी कांहीना काही खरेदी करतात. अनेकजण वेगवेगळे व्यवसाय सुरू करतात. सृजनशील माणसे देश व जनकल्याणासाठी विविध धार्मिक विधी करतात. मात्र, येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी यापैकी काहीही न करता जिंतूर-औरंगाबाद-औंढा या राज्य महामार्गावरचे खड्डे बुजविण्यासाठी संबंधित बांधकाम विभागाला साकडे घालत मार्गावरील खड्ड्यात विधीवत होमहवन करून आंदोलन केले. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची शहरात एकच चर्चा रंगली होती. 
 
जालना ते जिंतूर मार्गे विदर्भ, तेलंगणा या प्रदेशात ४० ते ६० टन किंवा त्यापेक्षाही जास्त वजनाची वाहतूक तसेच प्रवासी वाहतूक होत असलेल्या या सतत वर्दळीच्या राज्य महामार्गाची अत्यंत दुर्दशा झाल्याने हा मार्ग मृत्युचा सापळा बनला आहे. याबाबत संबंधितांना वारंवार विनंत्या, अर्ज, आंदोलन करण्यात आले. तरी काहीही उपयोग झाला नसल्याने सार्वजनिक बांधकाम, राज्य महामार्ग विभाग, जालना यांचे जनतेच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. तरी त्याचा काही उपयोग झाला नाही.  

हेही वाचा - नांदेड : रेणुका मंदिरात ४७ लाखांचा अपहार, माजी संचालकांवर गुन्हा दाखल

जीवघेण्या प्रवासमार्गातून सुटका व्हावी 
प्रवासी जनता तसेच दुचाकीस्वारांह वाहनचालक चालकांची या जीवघेण्या प्रवासमार्गातून सुटका व्हावी यासाठी विजयादशमीच्या मुहूर्ताचे औचित्य साधून संभाजी ब्रिगेडतर्फे रविवारी (ता.२५) शहरातील अण्णा भाऊ साठे चौकात जालना, परभणी, औंढा त्रिफूलीवरच्या खड्ड्यात संबंधित अधिकारी, कंत्राटदार यांचे फोटो लावून होमहवन करून निषेध करण्यात आला. 

हेही वाचा - अवांतर वाचनानेच येते शहाणपण : डॉ. सुरेश सावंत

विधिवत केली पूजा 
या वेळी पूजा विधीसाठी सुनील गुरु यांनी पौरोहित्य केले. संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर, तालुकाध्यक्ष बाळासाहेब काजळे, सामाजिक कार्यकर्ता नागेश आकात, विष्णू गाडेकर, धनंजय जाधव, सुनील गाडेकर, विनोद पिंगळे, पिंटू डोंबे, संदीप राठोड, ज्ञानेश्वर रोकडे, समशेर चव्हाण, भगवान रोकडे, पिंटू रोकडे, अनिल दाभाडे, सोपान धापसे, विजय पाटील, बाबा डोंबे, अशोक शिंदे, मुसा कुरेशी, प्रकाश शिंदे, संतोष रोकडे, गजानन ताठे आदी सहभागी झाले होते.  

 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Home Havan' for Jintur to fill chucky pits, Parbhani News