esakal | कुंभार पिंपळगावात एक हजार जणांना होम क्वारंटाइन 
sakal

बोलून बातमी शोधा

कुंभार पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र. 

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर कुंभार पिंपळगावसह २४ गावांत मागील आठवडाभरापासून बाहेरगावाहून आलेल्या एक हजार ११३ रुग्णांची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला.

कुंभार पिंपळगावात एक हजार जणांना होम क्वारंटाइन 

sakal_logo
By
लक्ष्मीकांत कुलकर्णी

कुंभार पिंपळगाव (जि.जालना) - कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर कुंभार पिंपळगावसह २४ गावांत मागील आठवडाभरापासून बाहेरगावाहून आलेल्या एक हजार ११३ रुग्णांची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपाली चव्हाण-राठोड व आरोग्य कर्मचारी ऊर्मिला वळसे यांनी दिली.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर कुंभार पिंपळगाव आरोग्य केंद्राअंतर्गत २४ गावांत मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा, सांगली, कोल्हापूर यासह अन्य महानगरांतून व ऊसतोड करून आलेले कामगार अशा एकूण एक हजार ११३ ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. त्यांना दोन आठवडे होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला.

हेही वाचा : ग्रामीण भागातील हार्वेस्टरचीही चाके थांबली

गावात अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले व खबरदारीच्या सूचना दिल्या. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने घंटागाडीद्वारे गावात जनजागृती करण्यात येत आहे तर पोलिस उपनिरीक्षक सचिन कापुरे, कर्मचारी रामदास केंद्रे, विष्णू कुटे यांनी गावात चोख बंदोबस्त ठेवला आहे. 

हेही वाचा : जालना जिल्ह्यात ३२ चेकपोस्ट

राजाटाकळी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत नऊ गावांत महानगरातून व अन्य बाहेरगावाहून आलेल्या ६४३ ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. त्यात एका गावात थेट विदेशातून आलेल्या एका जणाला तपासणीसाठी जालना येथे नेण्यात आले होते मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. या रुग्णांना होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली राजपूत व आरोग्य कर्मचारी हुलसिंग राठोड यांनी दिली. 

अनेक खासगी दवाखाने बंद 

कुंभार पिंपळगाव येथील अनेक खासगी डॉक्‍टरांनी कोरोनाच्या धास्तीने आपले दवाखाने बंद ठेवले. दरम्यान, गावातील सर्व खासगी डॉक्‍टर्स, मेडिकल दुकानदार यांची पोलिसांनी नोंद घेतली व वरिष्ठांना याबाबतचा अहवाल दिला. येथील खासगी डॉक्‍टर कौस्तुभ देशमुख यांनी दवाखान्यासमोर मंडप टाकून आलेल्या रुग्णांच्या मध्ये तीन-चार फुटांचे अंतर ठेवून रुग्णांना बसवले व साबणाने हात धुऊनच आत प्रवेश दिला आहे, हे विशेष. 

अंबड - घनसावंगी तालुक्‍यातील काही खासगी दवाखाने बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. शासनाच्या धोरणानुसार कुठल्याही डॉक्‍टरांना त्यांचे दवाखाने बंद ठेवता येणार नाहीत व सामान्य जनतेच्या उपचारासाठी त्यांनी दवाखाने तातडीने उघडावेत, लोकांवर उपचार करावेत. हे करताना कोरोना विषाणूचा प्रसार होणार नाही याची खबरदारी सर्व डॉक्‍टरांनी घ्यावी. मास्क बांधून येणे, रुग्णांत अंतर ठेवणे आणि त्या पद्धतीचे जनजागृती फलक लावावेत. दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करावी लागेल. तशा पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. 
- शशिकांत हदगल, 
उपविभागीय अधिकारी, अंबड 

कुंभार पिंपळगाव, राजाटाकळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात बाहेरगावाहून आलेल्या लोकांची माहिती गोळा करून त्यांची तापसणी केली जात आहे व त्यांना दोन आठवडे घरी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 
- डॉ. नागेश सावरगावकर, 
तालुका आरोग्य अधिकारी, घनसावंगी 

loading image