होंडे खून प्रकरण ते निवडणुकीची रणधुमाळी

होंडे खून प्रकरण ते निवडणुकीची रणधुमाळी

जालना - नव्या वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी घडलेल्या सुमित्रा होंडे खून प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडवून दिली. त्यातच पंधरवड्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी रंग धरू लागली. दरम्यान, युतीत रंगलेला कलगीतुरा आणि आघाडीचा जागा वाटपांचा तिढा गाजला. वर्ष नवे असले तरी जानेवारीचे चित्र जुनेच राहिले. अर्थात नोटाबंदीच्या निमित्ताने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची आंदोलने झाली. शहर स्वच्छतेनंतरचे कचऱ्याचे ढिगार कायम राहिले.

पारंपरिक दोन मित्र दुरवले
जालना जिल्ह्याच्या राजकारणात जवळपास पंचवीस वर्षांपासून भाजप, शिवसेना यांच्यात युती होती. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन विविध संस्था, विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका लढवून सत्तेची फळेही चाखली. मात्र राज्यात व केंद्रात युतीची सत्ता आल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान दिल्याच्या कारणावरून दोन्ही पक्षांतील नेत्यांचा इगो जागा झाला. यावरून एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्न सुरू झाले. गेल्या महिन्यात शहरात विविध विकासकामांच्या उद्‌घाटनावरून दोन्ही पक्षांत मतभेद विकोपास गेले. भाजपाने विकासकामाच्या उद्‌घाटनाला शिवसेनेच्या स्थानिक आमदाराला टाळले. केवळ विकासकामाचे श्रेय घेण्यासाठी भाजपने हे कारस्थान रचल्याचा आरोप शिवसेनेतून झाला. तर विकासासाठी मोठा निधी खेचून आणला. त्यामुळे उद्‌घाटन केले तर काय बिघडते, अशी भूमिका भाजपने घेतली. त्यातच राज्यस्तरावरील या पक्षाच्या नेत्यांनी युती तोडण्याची घोषणा केल्यामुळे दोन मित्र दुरवले.

टोपे - खरात भेटीची चर्चा रंगली
राजेश टोपे आणि विलासराव खरात हे पारंपरिक राजकीय विरोधक. परंतु घनसावंगी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन्ही दिग्गज नेते शिवसेनेच्या विरोधात एकत्र आले. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने 16 जागांवर बाजी मारली. श्री. खरात यांच्या भाजपला दोन जागा मिळाल्या. या निवडणुकीत शिवसेनेचा धुवा उडाला. दोन्ही नेत्यांची खेळी यशस्वी ठरली. निवडणुकीत दोन्ही नेते पारंपरिक मतभेद दूर ठेवून एकत्र आल्याने राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा झाली.

शहर स्वच्छता औटघटकेची
जालना शहर हे व्यापारी शहर म्हणून ओळखले जाते. दररोज या शहरात दहा टनांपेक्षा अधिक कचरा जमा होतो. परंतु पालिकेकडून या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने केल्या जात नसल्याने शहराला बकाल स्वरूप आले. नव्या पदाधिकाऱ्यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर पालिकेने शहरात स्वच्छता अभियानही राबविले होते, परंतु शहरात ऐनवेळी विविध रस्त्यांचे कामे सुरू झाल्याने त्यांना हे अभियान इच्छा असूनही केवळ अर्ध्यावरच थांबवावे लागले. यामुळे शहर अभियान केवळ औटघटकेचे ठरले. त्यामुळे शहरातील रस्त्यावर नेहमीप्रमाणे कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत.

दोन्ही कॉंग्रेस निवडणुकीत एकत्र
जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागले. भाजप आणि शिवसेना हे दोन मित्रांनी या निवडणुकीत एकमेकांच्या विरुद्ध दंड थोपटल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. मित्राच्या विरुद्ध निवडणुकीचा प्रचार करावा लागणार असल्यामुळे दोन्ही पक्षांतील दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वर्षानुवर्षे एकत्र राहिलेल्या नेत्यांना हे कितपत पचनी पडले की नाही हा मोठा संशोधनाचा विषय आहे. युती तुटल्यामुळे दोन्ही कॉंग्रेसमध्ये जल्लोष होत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी या निवडणुकीत एकत्र येण्याचा निर्णय घेतला. एकत्र येण्यासाठी प्रारंभी मोठे आढेवेढे घेतले. जागा वाटपाचा तिढाही राहिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com