ऑनर किलिंग प्रकरणी एकाला फाशी, दुसऱ्याला जन्मठेप

Honor Killing
Honor Killing

नांदेड : ऑनर किलिंग प्रकरणी आज (गुरुवार) भोकर सत्र न्यायालयाने दोघा भावांना दोषी ठरवत एकाला फाशी, तर दुसऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दिगंबर दासरे आणि मोहन दासरे (रा. थेरबन) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोषींची नावे आहेत. या दोघा भावांनी त्यांच्या बहिणीची आणि तिच्या प्रियकराची हत्या केली होती.

नांदेड जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी प्रेमप्रकरणातून ऑनर किलिंगचा प्रकार घडला होता. यामध्ये प्रेमी युगुलांची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. हत्येच्या घटनेमुळे हे प्रकरण मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चांगलेच गाजले होते. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील थेरबन येथे 23 जुलै 2017 ला ही खळबळजनक घटना घडली होती. 23 जुलै 2017 रोजी दोषीची बहीण पूजा वर्षेवार ही गावातीलच गोविंद कराळे या तिच्या प्रियकरासोबत सैराट झाल्याने आरोपीच्या मनात राग होता. हा राग मनात धरुन दोषी दिगंबर दासरे याने आपल्या चुलत भावाच्या मदतीने दोघांचेही लग्न लावून देतो, म्हणून बहीण पूजा आणि प्रियकर गोविंद या दोघांना एका निर्जन स्थळी बोलावले. तेथे त्यांच्यावर कोयत्याने वार करत गळा चिरून त्यांची निघृणपणे हत्या केली होती.

या प्रकरणी आरोपी दिगंबर दासरे आणि मोहन दासरे यांना भोकर पोलिसांनी अटक करून दोषारोप पत्र दाखल केले होते. दोन वर्षानंतर भोकरच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणी आज निकाल जाहीर केला. ऑनर किलिंग प्रकरणी दिगंबर आणि मोहन यांना न्यायाधीश एम.एस.शेख यांनी दोषी ठरवत दिगंबरला दुहेरी फाशी, तर मोहन यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती. सरकारी पक्षाकडून अॅड. रमेश राजूरकर यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com