
Crime News : वैजापूर तालुक्यात घडले ‘सैराट’; चौघांना अटक
वैजापूर : तालुक्यातील विनायकनगर-भिवगाव शिवारामध्ये ‘सैराट’ चित्रपटाप्रमाणेच पुन्हा एकदा ऑनर किलिंगची घटना घडली असून संशयित मुलीच्या कुटुंबाने मिळून मुलीच्या प्रियकराचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.२८) सकाळी उघडकीस आली.
हा मुलगा अल्पवयीन असून तो दहावीत शिकत होता. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. सचिन प्रभाकर काळे (वय १५, रा विनायकनगर, वैजापूर) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी भिवगाव शिवारात राहणाऱ्या मुलीच्या आई, वडील, काका व आजोबा यांना संशयित आरोपी म्हणून अटक केली आहे. सचिन हा तीन दिवसांपासून घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या वडिलांनी वैजापूर पोलिसात दिली होती.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, भिवगाव शिवारात असलेली एक अल्पवयीन मुलगी व सचिन हे दोघे विनायकनगर येथील जिल्हा परिषद शाळेत दहावीत सोबत शिक्षण घेत होते. या मैत्रीतून दोघांचे प्रेम जुळले होते.
तो या मुलीला भेटण्याकरीता शनिवारी (ता.२५) पहाटे भिवगाव शिवारात आला असता मुलीचे आजोबा, काका व आई, वडिलांनी त्याला मारहाण करून जागीच ठार मारले. नंतर मृतदेह गावच्या शेतात फेकून दिल्याचा पोलिसांना संशय आहे.
मंगळवारी सकाळी परसोडा रस्त्यावर असलेल्या पेंधे वस्तीजवळ (गट न.२३१) गव्हाच्या शेतातून उग्र वास येत असल्याने खुनाचे बिंग फुटले. दरम्यान, वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून चार जणांना अटक केली असून भादंवि कलम ३०२, अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
एक तासात संशयित ताब्यात
मृत सचिनच्या वडिलांनी २५ फेब्रुवारीला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार वैजापूर पोलिस ठाण्यात दिली होती. विशेष म्हणजे या फिर्यादीमध्ये त्या मुलीच्या कुटुंबावर त्यांनी संशय घेतला होता. त्यामुळे पोलिसांनी पंचनामा व घटना स्थळावर काही महत्त्वाचे पुरावे गोळा करत संशयित आरोपींना तासाभरात बेड्या ठोकल्या. घटनास्थळी सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी, पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील, बीट जमादार मोइज बेग,पो.कॉ. प्रशांत गीते यांनी पंचनामा केला.
एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने हळहळ
मृत सचिनच्या पश्चात आई, वडील व तीन मोठ्या बहिणी असा परिवार आहे. सचिन घरात सर्वात लहान असल्याने सर्वांचा लाडका होता. वडील शेती व आठवडी बाजारात कपडे विक्रीचा व्यवसाय करतात. दरम्यान, एकुलत्या एक मुलाच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
अगोदर दिली होती समज
मुलीचे परजातीतील मुलाशी प्रेमसबंध होते. हा प्रकार तिच्या घरातील लोकांना कळाला होता. त्यामुळे सर्व संतप्त होते. मुलाला शाळेत व घरी समज दिली. असे असतानाही सचिन पुन्हा त्या मुलीला भेटण्यासाठी मध्यरात्री त्याच्या शेतात गेला. त्याचवेळी मुलीचे आई, वडील, आजोबा व काकाने सचिनचा खून करून त्याला गव्हाच्या शेतात फेकून दिल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली.
तीन महिन्यांपूर्वी जुळले प्रेमसंबंध
सचिन व मुलगी हे दोघे विनायकनगर येथील शाळेत असताना तीन महिन्यापूर्वी त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी दहावीचा निरोप समारंभ झाल्याने त्यांची भेट होत नव्हती. त्यामुळे २४ फेब्रुवारीला सचिन व त्याच्या एका मित्राने त्या मुलीची भेट घेऊन तिला मोबाईल गिफ्ट दिला. त्याच मध्यरात्री सचिनने त्या मुलीशी मोबाईलवर संपर्क करून त्या मुलीच्या घरी भेटायला गेला अन् तिथेच घात झाला.