तरुणाच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयात गोंधळ

जिल्हा रुग्णालयात गोंधळ
जिल्हा रुग्णालयात गोंधळ

परभणी : पोट दुखीच्या आजाराने त्रस्त असलेल्या तरुणाला जिल्हा शासकीय रुग्णालयात बुधवारी (ता.२०) भरती करण्यात आले होते. परंतु, या तरुणाचा गुरुवारी (ता.२१) अचानक मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच झाला असल्याचा आरोप करीत मृत तरुणाच्या नातेवाइकांनी केला असून रुग्णालयात गोंधळ घातला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडे संबंधित डॉक्टरांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे.

परभणी शहरातील भीमनगरमधील रहिवाशी नितेश भीमराव हतागळे (वय ३०) यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याने बुधवारी (ता.२०) त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्जिकल कक्षात दाखल करण्यात आले. बुधवारी दिवसभर त्यांच्यावर उपचार सुरु होते. रात्री त्यांची प्रकृती सुधारली होती. गुरुवारी (ता.२१) सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यात त्यांचा सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. नितेश हतागळे यांचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केली. भीमनगर परिसरातील बरेचर हिवाशीदेखील दवाखान्यात दाखल झाले. त्यामुळे रुग्णालय परिसरात गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे नानलपेठ पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. दवाखान्यात भीमनगर कॉलनीचे नगरसेवक सुशील कांबळे यांच्यासह अनेक जणांनी भेटी दिल्या. 
दरम्यान, दवाखान्यात भरती असलेल्या नितेश हतागळे यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याचे त्यांच्यासोबत थांबलेल्या काही जणांनी संबंधित डॉक्टरांना दिली होती. परंतु, डॉक्टरांनी त्यांच्यावर योग्य ते उपचार केले नाहीत व हलगर्जीपणे दुर्लक्ष केले. त्यामुळेच नितेश हतागळे यांचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला. 

पोलिसांकडे तक्रार
भीमनगर परिसरातील नगरसेवक सुशील कांबळे व इतरांनी या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार दिली. या तक्रारीत म्हटले आहे की, या नितेश हतागळे यांचा मृत्यू ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच झाला आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील सेवा व्यवस्थित नसून यामुळेच तेथे रुग्णांचे बळी जात आहेत, असा आरोप या तक्रारअर्जात केला आहे.

 

चौकशी करणार 
नितेश हातागळे यांचा मृत्यू कशा मुळे झाला याची चौकशी केली जाईल. परंतु, आमचे डॉक्टर वारंवार रुग्णावर लक्ष ठेऊन असतात, असे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com