हे खासगी रूग्णालय तर नाही ना?

Latur
Latur

लातूर : गरोदर मातांची तपासणी, सुरक्षित बाळंतपण, नवजात अर्भकावरील उपचाराचे विशेष केंद्र, सोनाग्राफी, रक्त तपासणीसह रक्त साठवणूक केंद्र, कुटुंब नियोजन व सिझेरियन शस्त्रक्रिया, भोजन व नास्ता, प्रसूतीनंतर सरकारी वाहनाने घरी नेऊन सोडणे, प्रशस्त तीन मजली ईमारत आदीसह येथील स्त्री रूग्णालयातील विविध सुविधा व दर्जेदार उपचार पाहून महाराष्ट्र विधानसभा आश्वासन समितीचे सदस्य आमदार नागेश पाटील क्षणभर बुचकळ्यात पडले. त्यांनी हे खासगी रूग्णालय तर नाही ना? असा प्रश्न समितीचे दुसरे सदस्य आमदार विनायक पाटील यांना विचारला.

आमदार जयप्रकाश मुंदडा यांच्या नेतृत्वाखालील समितीने शुक्रवारी (ता. १५) रूग्णालयाला भेट देऊन तासभर सुविधांची पाहणी केली. त्यावेळी आमदार नागेश पाटील आष्टीकर रूग्णालयातील सुविधा तसेच रूग्णांची गर्दी पाहून भारावले. त्यांनी रूग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले. शहराच्या एका कोपऱ्याला असलेल्या लेबर कॉलनीत हे सार्वजनिक आरोग्य विभागाचे हे स्त्री रूग्णालय आहे. शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व महानगरपालिकेचा दवाखाना सोडला तर हे तिसरे सरकारी रूग्णालय आहे. पूर्वी रूग्णालयाच्या आवारात डुकरांचा वावर होता. दुर्गंधीसह रूग्णालयात सुविधांचा अभाव होता. वर्षभरात रूग्णालयाने कात टाकत अनेक सुधारणा केल्या आहेत. स्वच्छतेसह रूग्णांना तातडीने आणि दर्जेदार सेवा देण्यावर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी भर आहे. यातूनच वर्षातच रूग्णांची संख्या वाढून ती 44 हजारावर केली आहे. रूग्णालयात प्राधान्याने महिलांनाच उपचार देण्यात येतात. यात सुरक्षित बाळंतपणाला प्राधान्य आहे.

वर्षभरात प्रसूतीसह, सिझेरियन आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांत दुपटीने वाढ झाली आहे. पावणेचार हजार महिलांची सोनाग्राफी झाली आहे. यासह सर्व उपचार आणि सुविधा मोफत दिल्या जातात. आश्वासन समितीने सुविधांची पाहणी करून रूग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून रूग्णालयात खरेच मोफत उपचार मिळतात का, याची खातरजमा केली. सुविधा पाहून आमदार पाटील यांना हे सरकारी रूग्णालय असल्याबाबत संभ्रम निर्माण झाला आणि मोठ्या सुविधा पाहून ते भारावले. त्यांनी जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व समितीचे सदस्य विनायक पाटील यांना हे गव्हर्नमेंट हॉस्पीटल आहे, की प्रायव्हेट?, असा प्रश्न विचारला. समितीने एकुणच रूग्णालयातील कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदिप ढेले यांनी समितीला रूग्णालयांतील सेवा आणि सुविधांची माहिती दिली.      

ती प्रसूती नॉर्मलच..!
लग्नाच्या आठ वर्षानंतर गरोदर एक महिला रूग्णालयात गुरूवारी (ता. १४) रात्री भरती झाली होती. तिच्या नातेवाईकांकडून तातडीने सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी आग्रह सुरू होता. डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी त्यांना धीर धरण्याचा सल्ला दिला व शुक्रवारी सकाळी महिलेची नॉर्मल प्रसूती झाली. नॉर्मल प्रसूतीपेक्षा सिझेरियनला प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा होते. वार्डात भेट दिल्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी आमदार मुंदडा यांना स्वतःहून ही माहिती दिली. नॉर्मल प्रसूतीच्या तुलनेत सिझेरियन शस्त्रक्रियेचे कमाल प्रमाण 25 टक्के अपेक्षित आहे. स्त्री रूग्णालयात ते 23 टक्के असल्याची माहिती डॉ. ढेले यांनी या वेळी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com