औरंगाबाद : वाहनाच्या धडकेत हॉटेलमालक ठार, एक गंभीर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

केंब्रिज चौक ते सावंगी बायपास रोडवरील घटना

औरंगाबाद - भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार हॉटेलमालक ठार झाला, तर सोबतचा तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी (ता. पाच) सकाळी सव्वासहाच्यासुमारास केंब्रिज चौक ते सावंगी बायपास रस्त्यावर झाला. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, विलास सोपान शेळके (वय 40, रा. कुंभेफळ) असे मृताचे नाव आहे. या अपघातात योगेश दादाराव शेळके (35, रा. कुंभेफळ) हे गंभीर जखमी झाले. विलास शेळके यांचे नारेगाव परिसरात हॉटेल होते. रविवारी सकाळी विलास हे योगेश शेळके यांच्यासोबत दुचाकीवरून नारेगावकडे जात होते. केंब्रिज चौक ते सावंगी बायपास रोडवर त्यांच्या दुचाकीला भरधाव वाहनाने धडक दिली.

या घटनेनंतर एमआयडीसी सिडको पोलिस घटनास्थळी पोचले. त्यांनी विलास व योगेश यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्‍टरांनी विलास यांना तपासून मृत घोषित केले. योगेश यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली. तपास पोलिस नाईक भानुदास खिल्लारे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hotel owner killed in accident at Aurangabad