गृहिणी बनली उद्योजिका

राजाभाऊ नगरकर
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

जिंतूर  (परभणी) : ज्या महिलांना कधी घराचा उंबरठाही ओलांडला नाही त्या आज बचत गटाच्या माध्यमातून बॅंकाचा व्यवहार करत आहेत. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील डाेंगरा भागातील देवीसाहेब संस्थानमुळे परिचित असलेले भोगाव देवी येथील गृहिणी सविता आबासाहेब जाधव यांनी ‘जगदंबा दालमिल’ सुरू करून गावातील बेरोजगार महिलांच्या हातालाही काम दिले. पाच वर्षांत त्यांनी लाखोंची उड्डाणे घेतली आहेत. ग्रामीण भागातील अनेक महिलाही उद्योजक होऊ शकतात, हे त्यांना दाखवून दिले आहे.

  भोगाव येथील आबासाहेब विनायकराव जाधव यांना दहा एकर जमीन आहे. परंतु, सिंचनासाठी शेतातील विहिरीला पुरेसे पाणी उपलब्ध राहत नसल्याने पीक उत्पानासाठी तथा एकूणच शेतीसाठी लागणारा खर्चही हाती येत नव्हता. त्यातून निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणीमुळे कुटुंबाची ओढाताण होत असे. त्यामुळे त्यांचे पती आबासाहेबही सतत आर्थिक विवंचनेत राहत. सविता यांचे पदवीपर्यंत शिक्षण झालेले असताना नोकरीच्या मागे न लागता अशा बिकट परिस्थितीत कुटुंबाला हातभार लावण्यासाठी संसार सांभाळत स्वतःच्या पायावर उभे राहून कांहीतरी उद्योग व्यवसाय करण्याचा निश्चय केला.

पाच वर्षात लाखोंची उड्डाणे
शासनाच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेंतर्गत जिल्हा खादी ग्रामोद्योग परभणी, यांच्याकडे बचत गटाच्या माध्यमातून प्रस्ताव सादर केला. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर जिंतूर येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेने प्रस्तावानुसार तेरा लाख ७५ हजार रुपये कर्ज मंजूर केले. त्यामधून यंत्रसामग्री, आवश्यक साहित्य, सुविधांची उपलब्धता व गरजांची पूर्तता करून सन २०१४ मध्ये त्यांनी ‘जगदंबा दालमिल’ची उभारणी केली. परंतु, २०१४ मधील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना कुठल्याच डाळवर्गीय पिकांचे उत्पादन झाले नसल्याने त्यात नवीन व्यवसाय असल्याने सविता यांनी खचून न जाता आपला व्यवसाय नियमित चालू ठेवला. त्यामुळे पहिल्या वर्षी एक लाख रुपये, दुसऱ्या वर्षी दोन लाख रुपये, तिसऱ्या वर्षी अडीच लाख रुपये, चौथ्या वर्षी साडेतीन लाख रुपये व पाचव्या वर्षी साडेचार लाख रुपये त्यांना निव्वळ नफा झाल्याचे त्यांनी सांगितले.

सहाजणांना मिळाला रोजगार
या दाल मिलमध्ये भोगावसह जिंतूर शहरासह तालुक्यातील पुंगळा, पांगरी, पाचलेगाव, वडाचीवाडी, लिंबाळा, सुकळी, मानधनी, आडगाव व शेजारच्या तालुक्यातील शेतकरी डाळ तयार करून घेण्यासाठी येतात. त्यामुळे सध्या ‘जगदंबा दालमिल’चा व्यवसाय चांगला भरभराटीला आला आहे. अर्थात या यशाच्या मागे त्यांचे पती आबासाहेब जाधव खंबीरपणे उभे आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारचे डाळवर्गीय पिके खरेदी करून तयार डाळींचे मार्केटिंग करतात. सविता जाधव यांच्या या धाडसी निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागून चार महिला व दोन मजुरांना सुद्धा रोजगार उपलब्ध झाला आहे.
.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: housewife became a entrepreneur

फोटो गॅलरी