Video : अखेर असा पकडला बिबट्या : पहा Photos

अतुल पाटील 
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

त्या बंदिस्त खोपटात बिबट्या दिसेना तेव्हा टॉर्चची शोधाशोध सुरू झाली. वन कर्मचाऱ्यांजवळील बारक्‍या बॅटरीच्या उजेडात आतले काही दिसेना. तेव्हा खुद्द विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर पॉवरफुल टॉर्च घेऊन आले. थेट ते खोपटाच्या छतावरच चढले.

औरंगाबाद : सिडको एन-वन परिसरात मॉर्निंग वॉकसाठी उद्यानात आलेल्या नागरिकांना मंगळवारी (ता. 3) सकाळी दिसलेला बिबट्या अखेर आठ तासांनंतर पकडण्यात आला. घर, उद्यान, मंदिर आणि रस्त्यावर वावरणाऱ्या बिबट्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकविला होता. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन तासांच्या मोहिमेनंतर बेशुद्ध करुन त्याला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. 

शहरातील उच्चभ्रू सिडको एन-वन परिसरात लोकांची वर्दळ तशी कमीच असते. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नागरिकांना दिसला. साकोळकर हॉस्पिटलच्या मागील प्रमोद नाईक यांच्या बंगल्यात सकाळी सहा वाजता परिसरातील श्री. शेख हे झाडांना पाणी घालत असताना त्यांना बिबट्या दिसला. त्यांना पाहून उद्यानात धूम उडी मारली. तिथे बराच वेळ वावरल्यानंतर बिबट्याने उत्तरेच्या गेटने हनुमान मंदिराच्या परिसरात उडी टाकली. लोकांनी दगड मारुन हटकल्यानंतर पुन्हा तो डॉ. तोष्णिवाल यांच्या मालकीच्या परिसरातून पुन्हा उद्यानमार्गे नाईक यांच्या घरात उडी मारून आला. तिथे दुपारी बारा वाजेपर्यंत त्यांचा वावर होता. 

अरे बापरे - 18 हजार प्रसूतींत 66 मातामृत्यू

वनविभागाचे रेस्क्‍यू ऑपरेशन सुरु झाल्यानंतर नाईक यांच्या बंगल्यातच गेटला जोराची धडक देत तो पळाला. त्यानंतर प्रसिद्ध काळा गणपती मंदिराच्या मागील बाजूस नुकतेच डॉ. तोष्णिवाल यांनी घेतलेल्या जागेत बिबट्याने प्रवेश केला. दुपारी बारा वाजता परिसरातील पडक्‍या आणि बंद घरात तो जाऊन बसला. त्या घराला दरवाजाच नसल्याने सुरवातीला जाळी लावण्यात आली होती. त्यानंतर प्लायवुड लावून बंदिस्त करण्यात आला. 

Sunil Kendrekar

विभागीय आयुक्तांनी आणला टॉर्च 

त्या बंदिस्त खोपटात बिबट्या दिसेना तेव्हा टॉर्चची शोधाशोध सुरू झाली. वन कर्मचाऱ्यांजवळील बारक्‍या बॅटरीच्या उजेडात आतले काही दिसेना. तेव्हा खुद्द विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर पॉवरफुल टॉर्च घेऊन आले. थेट ते खोपटाच्या छतावरच चढले. टॉर्च लावून पाहिले असता, तो किचन ओट्याखाली बसल्याचे दिसले. त्यानंतर शूटर मोईनुद्दीन शेख आणि आदि गुडे यांनी घरावरील सिमेंटचा पत्रा फोडत बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्‍शन शूट केले. त्यानंतर चौदा मिनिटांचा वेळ जाऊ देत कर्मचाऱ्यांनी आत जाऊन त्याला जाळीत पकडले. 

Image may contain: one or more people, crowd, wedding and outdoor

लोकांचा एकच गलका 

विशेष म्हणजे, सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत मुक्‍त वावर असलेल्या बिबट्याने कुणावरही हल्ला केला नाही. त्याला पकडल्यानंतर लोकांनी टाळ्या वाजवत "भारत माता की जय' अशा घोषणा दिल्या. बिबट्या घुसल्याने सकाळी सहा वाजेपासून सुरु असलेला थरार दुपारी अडीच वाजता थांबला. वापरात नसलेल्या घरात घुसल्याने वनविभागाच्या शूटरचे काम सोपे झाले. वनविभागाच्या कार्यालयात उपचार करुन बिबट्याला पुन्हा त्याच्या मूळ अधिवासात सोडण्यात येणार आहे. 

aurangabad

दगड मारल्याने बिबट्या 
मंदिरातून पुन्हा उद्यानात 

सकाळी सात वाजेनंतर गणपती मंदिराशेजारील गोंधळ पाहून बिबट्या माघारी फिरला. त्यानंतर उद्यानाच्या उत्तर बाजुला असलेल्या हनुमान मंदिरात सकाळी आठ वाजता दिसल्याचे अंजली देशपांडे यांनी सांगितले. मंदिराच्या आग्नेय दिशेला असलेल्या डीपीखाली बिबट्या बसला होता. देशपांडे यांनी घराच्या गच्चीवरुन हा प्रकार पाहिला. लोक जमल्यानंतर काही लोकांनी बिबट्याला दगड मारले. त्यानंतर तो पुन्हा एन-एकच्या उद्यानात घुसल्याचे सांगितले. देशपांडे यांचे घर हनुमान मंदिर आणि उद्यानाच्या मध्ये आहे. मंदिर परिसरातून उद्यानात बिबट्या गेल्याचे महापालिकेच्या सफाई कामगार हौसाबाई दिवेकर यांनी "सकाळ'ला सांगितले. त्या सफाई करण्यासाठी घंटागाडीसोबत फिरत होत्या. 

हेही वाचा - चंपाषष्ठीला का नसतात या मंदिरात खंडोबा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How the Leopard Rescued in Aurangabad