अशा आणखी किती शीतलचा बळी जाणार ?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

औरंगाबाद - मराठवाड्यात दुष्काळाचा विक्राळ चेहरा आणखी पुढे येतोय. गतवर्षी झालेल्या चांगल्या पावसाने यंदा परिस्थिती सुधारेल अशी आशा वाटत होती; मात्र दररोज शेतकरी आत्महत्यांचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. काल लातूर जिल्ह्यातील भिसे वाघोली या गावातील शीतल व्यंकट वायाळ या शेतकऱ्याच्या एकवीस वर्षीय मुलीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या मुलीने लिहिलेल्या चिठ्ठीत मरणाचे कारण देताना वडिलांच्या आर्थिक स्थितीमुळे आपले लग्न होत नसल्याने आपण आत्महत्या केल्याचे तिने म्हटले आहे. मराठवाड्यात गेल्या वर्षभरात अशा प्रकारे अनेक तरुणींनी केवळ दुष्काळामुळे व घरच्या आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे, त्यामुळे अशा किती शीतलचा बळी अजून जाणार आहे, असे उद्वेगाने म्हणावेसे वाटत आहे.

भिसे वाघोलीची शीतल काल जेव्हा आत्महत्या करत होती. तेव्हा तिच्या जवळच्या शहरात जिल्हा केंद्राच्या ठिकाणी महापालिकेचा प्रचार शिगेला पोचला होता. राज्यपातळीवरील अनेक नेते, राज्याचे मंत्री, पालकमंत्री, आमदार प्रचारात गुंतले होते; मात्र या गदारोळात शीतलची हाक कुणाला ऐकू आली नव्हती. आज बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मात्र सरकार व विरोधी पक्षांचे प्रतिनिधी गावाकडे धाव घेताहेत आणि त्या कुटुंबांना आश्‍वासने देताहेत. गेल्या दीड वर्षापूर्वी बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्‍यातील वारूळ तांडा या गावातील सर्व तरुण उपवर मुलींनी तालुक्‍याच्या तहसीलदाराला व जिल्हाधिकाऱ्यांना चक्क एक पत्रच लिहिले होते. या पत्रात या मुलींनी दुष्काळामुळे आम्ही लग्नाला नकार देत असल्याचे म्हटले होते. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंपासून अनेक नेत्यांनी या गावाला भेट देऊन या मुलींची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. या मुलींच्या या मागणीने प्रशासन व समाजातील धुरीणांनाही सुन्न करून सोडले होते. मराठवाड्यातील गावागावांत अशा अनेक मुली शीतलच्या मानसिकतेतून रोजचा दिवस पुढे ढकलताहेत. या प्रश्‍नाकडे समाजाने, प्रशासनाने व राज्यकर्त्यांनी वेळीच सावध होऊन पाहिले पाहिजे.

काय म्हणाली शीतल पत्रामध्ये ?
"मी शीतल व्यंकट वायाळ चिट्ठी अशी लिहिते, की माझे वडील मराठा कुणबी समाजात जन्मले असल्यामुळे त्यांच्या शेतात सलग पाच वर्षांपासूनच्या नापिकीमुळे आमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची व नाजूक असून, माझ्या दोन बहिणींचे लग्न गेटकेन करण्यात आले; परंतु माझे लग्न गेटकेन करण्यासाठी दोन वर्षांपासून बापाची दरिद्री संपत नव्हती. कुठल्याही बॅंकेचे अथवा सावकाराचे कर्ज माझ्या बापाला न मिळाल्यामुळे माझे लग्न दोन वर्षांपासून थांबले होते. तरी मी माझे माझ्या बापावरील वजं (ओझं) कमी करण्यासाठी व मराठा समाजातील रूढी, परंपरा देवाणघेवाण कमी करण्यासाठी स्वखुशीने आत्महत्या करत आहे. तरी मला व माझ्या कुटुंबाला समाजाने कुठलाही दोष देऊ नये.
- शीतल वायाळ

Web Title: How shital to be a victim of