कसा आहे श्री गुरु नानकदेवजी यांचा ‘प्रकाशपर्व’?

How is Shri Guru Nanakdev's Prakash Parva
How is Shri Guru Nanakdev's Prakash Parva

नांदेड : समस्त शिख विश्वासाठी श्री गुरु नानकदेवजी यांचा ५५० वा प्रकाशपर्व (जयंती) चैतन्याचा विषय आहे. शिख धर्मावर आणि गुरु नानक देव यांच्या मानवतावादी उपदेशांवर असंख्य मानवांची श्रद्धा व्याप्त आहे.

देशातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन, जैन, बौद्ध यासह अनेक धर्मांच्या भाविकांनी शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु श्री गुरु नानकदेवजी यांच्या साडेपाच जन्मशताब्दी वर्षाचे स्वागत केलेले आहे. हा सर्वधर्मीय सलोखा देशात असाच कायम राहिला आणि मानवता धर्म एकछत्राखाली एकत्र नांदू लागला तर भारतासारखा मोठ्या लोकतंत्राची व्याप्ती आणखीन विस्तारित होईल यात शंका नाही. म्हणून गुरु नानकदेव यांचा हा जन्मोत्सव देशासाठी आणि जगासाठी शांतता, एकोपा आणि चैतन्याचा अग्रदूत ठरावा अशी सदिच्छा व्यक्त करणे संयुक्तिक ठरेल. 

पंधराव्या शतकात सन १४६९ मध्ये तत्कालीन अखंड भारत भूमीवर श्री गुरु नानकदेवजी यांचे महता कल्याणचंद (वडील) यांच्या घरी जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव तृप्ता असे होते. पाकिस्तानमधील शेखूपूरा जिल्ह्यातील तलवंडी ह्या लहानसा गावात नानकांचे जन्म झाले आणि बालपण गेले. याच गावाला आज ननकाणासाहेब म्हटले जाते. नानकाचे वडील याच गावाचे पटवारी होते. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती होता. नानक यांचा मात्र या दोन्ही क्षेत्राशी काही देणं- घेणं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना दुसरं काही तरी चांगला व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. वडिलांनी, नानकांना २० रुपये देऊन सच्चा सौदा करण्यासाठी घराबाहेर पाठवलं. पण नानकांनी त्या पैशाचा उपयोग तीर्थकरी, उपाशी साधू- संतांसाठी लंगर (जेवण) तयार करून केलं. नानकांच्या दृष्टीने उपाशी मानवाला पोटभर जेवण देणे हाच सच्चा सौदा (व्यवसाय) असावा. गुरुजींचा हा सच्चा सौदा आज शीख धर्म लंगर म्हणून पाळतो. नानक यांनी सांगितलेले सर्व तत्व आज घडीलाही शीख धर्माच्या अनुसरणात आहेत त्यामुळेच गुरु नानक हे ' कल तारण ' रूपात आहेत असेच गृहीत ठेवले जाते. अर्थ एवढेच की कलियुगात जन्मलेला हा नानक बालपणीच जगाला कळू लागला होता. म्हणून गुरु नानक देवजी यांना " कलियुगाचा तारणहार म्हणून शिख समाज संबोधत असतो आणि ५५० वा प्रकाशपूर्व वर्ष साजरा करतांना शीख समाजाने " कल तारण गुरु नानक आया " हा बोधवाक्य सुद्धा प्रचारात आणला आहे.  

' हिंदूंचा गुरु आणि मुसलमानांचा पीर'

पुढे चालून गुरु नानक यांनी भारत भूमीवर अध्यात्म क्षेत्राचा पाया रचला. परमेश्वराची भक्ती, गुरुबाणी रचना आणि समाज संघटन करीत गुरु नानकदेवजी यांनी  "एक पिता - एकस के हम बारिक " म्हणजेच आम्ही सर्व एका परमेश्वराचीच संतान होय असा मंत्र दिला. त्यांनी हिंदू आणि मुसलमान यांना सारखा व्यवहार दिला म्हणुनच त्यांना ' हिंदूंचा गुरु आणि मुसलमानांचा पीर' संबोधले जाते. गुरु नानक यांनी अंगीकारलेल्या नविन जीवनशैलीलाच " शिख " किंवा सिख असे संबोधण्यात आले आणि ह्याच शब्दाने शिख धर्म उदयास आले. शिख शब्दाचा नेमका अर्थ आत्मसात करणे किंवा सतत शिकत जाणे असा होतो. 

गुरुग्रंथ साहेबाची रचना

गुरु नानक हे सामान्य माणसांमध्ये रमले. मानव समाजात व्याप्त अंधश्रद्धा विरुद्ध त्यांनी साक्षर करण्याचे कार्य केले. अंधश्रद्धेत अडकलेल्यांना त्यांनी जिवन जगण्याची नविन दिशा दर्शवली. या पृथ्वीवर वावरणाऱ्या विविध धर्मांना त्यांनी समानतेची वागणूक दिली. इतर धर्मांचे अनेक मार्गदर्शक तत्वांचा त्यांनी स्वतः अभ्यास केला आणि विविध जातिधर्मांच्या संत, साधू, महात्मा आणि महापुरुषांची त्यांनी भेट घेऊन विविध भाषेतील वाणी, श्लोक, दोहे एकत्रित करून गुरुजींनी महान असे संग्रहण तयार केले. कालांतराने त्यांचा समावेश श्री गुरु ग्रंथ साहब या ग्रंथामध्ये करण्यात आले. श्री गुरु ग्रंथसाहेबमध्ये संत कबीरदास, संत रवीदास, संत नामदेव महाराज, सुफी शेख फरीद, भक्त परमानंद यांच्या सह एकूण ३६ संतांची वाणी संग्रहीत आहे. यात सहा शीख गुरूंची वाणीचाही समावेश आहे. गुरुग्रंथ साहेबाची पृष्ठ संख्या १४३० असून ३१ रागांतर्गत गुरुवाणीची रचना करण्यात आलेली आहे. श्री गुरुग्रंथ साहेबाची रचना एक सर्वसक्षम सर्वधर्म समभावाचा उदाहरण म्हणून जगापुढे आले आहे. म्हणून गुरु नानकाचे हे अध्यात्मिक प्रयत्न जगाला तारण्याचे पाऊलच आहे असे मला वाटते.   

गुरुजींनी बाबर यास ' जाबर ' म्हणून संबोधले.

ज्या काळात गुरु नानकदेव यांचा जन्म झाला होता, त्या काळात आपल्या भारत देशावर परकीय आक्रमणकर्त्यांचे सतत हल्ले होत असे. राजा ऐवजी शासक यांनी सत्ता काबीज केल्या होत्या. त्यांच्यावतीने प्रजेवर जातीनुसार कर लादण्यात येत होते. मानवा- मानवामध्ये प्रचंड दुरावा निर्माण झालेला होता. गोर- गरीब जनता अत्याचारात होरपळत होती. यावेळी बाबर यासारख्या सशक्त शासका विरोधांत गुरु नानक यांनी आवाज उठवला. बाबर यांने गुरुजींना कैद करून कारागृहात पाठवलं. तरी पण गुरुजींनी बाबर यास ' जाबर ' म्हणून संबोधले. जाबर शब्दाचे अर्थ फारसीमध्ये घोर अत्याचारी असे आहे. ज्यामुळे बाबराला त्याच्या चुका अवगत झाल्या आणि त्यांने गुरूजीना कैदेतून मुक्त करून त्यांच्या सोबत कारागृहात डांबून ठेवण्यात आलेल्या सर्व बंदींनाही सोडून दिले. त्याने अनावश्यक कर माफ करण्याचे आश्वासन देखील गुरुजींना दिले. एक संत म्हणून गुरुजींनी सामान्य मानवांसाठी शासनकर्त्यांपुढे उगारले बंड उल्लेखनीय असेच म्हणायला हवे. 

कौटूंबिक माहिती

गुरुजींनी संत म्हणून फक्त शिख धर्मापुरतेच कार्य मर्यादित ठेवले नाही तर त्यांनी या भूमीवरील इतर धर्मांच्या अभ्यासासाठी संस्कृत, फारसी, अरबी आणि इतर भाषांचे ज्ञान आत्मसात केलं. सोबतच निरनिराळ्या धर्मांच्या धर्मग्रंथांचे ही त्यांनी अभ्यास केले. गुरुजी गृहस्थ होते. त्यांच्या पत्नीचे नाव सुलखना असे होते. त्यांना दोन मुले होती, त्यांची नावं श्रीचंदजी आणि लखमीचंदजी असे होते. जगातील निरनिराळे धर्म आणि त्यांच्या शिकवणी बाबत ज्ञान अर्जित करण्यासाठी गुरु नानक यांनी घर सोडून चार दिशांच्या धर्म यात्रा (तीर्थाटन) केल्या. त्यांच्या या यात्रांना उदासी म्हणून संबोधलं गेलं. गुरुजींनी आपल्या या यात्रांमध्ये हिंदु तीर्थस्थळांचे दर्शन घेतले. त्याठिकाणच्या पुजशैली, प्रथा, चाली- रीती जाणून घेतल्या. हरिद्वार, काशी, मथुरा, जग्गनाथपुरी सारख्या अनेक तीर्थ स्थानांना त्यांनी भेटी दिल्या. त्यांनी पुढे अरब देशांना भेटी देऊन मुस्लिम धर्माच्या विविध धार्मिक स्थळांविषयी अभ्यास केला. त्या काळात इराण, इराक, सुदान, मक्का - मदिना सारख्या अनेक देशांचे भ्रमण करणे सोपे कार्य नव्हते. दुसरीकडे गुरुजींनी श्रीलंका सारख्या देशालाही भेट दिली. याच यात्रेदरम्यान गुरुजी नांदेड आणि बिदरला आले होते असे अनेकांचे म्हणणे आहे. आपल्या देशविदेशाच्या भ्रमणात त्यांनी साधू, संत, मुल्ला, मौलवी, इतिहासकारसह विद्वान व्यक्तिमत्वाशी धर्मावर आधारित चर्चा केली. अश्या भेटीद्वारेच गुरु नानकांनी वाणी संकलन करून त्याचा उपयोग मानव जोडण्यासाठी केला. 

ब्रह्माण्डाचा एकच संचालक

पुढे गुरुजींनी परमेश्वराचा साक्षात्कार केल्यानंतर एक परमात्मा असा प्रचार केला. या ब्रह्माण्डाचा एकच संचालक असून सर्व मानव सारखे असल्याचा गुरुमंत्र दिला. त्यांनी जपूजी साहेब या गुरु वाणीचा उच्चार केला. या पृथ्वीवर ८४ लाख जीव, जंतू आणि प्राणी असून त्यांचा संचालक परमात्मा आहे असा युक्तिवाद गुरुजींनी केला. गुरु नानक देव यांनी केलेले उपदेश हे फक्त एका विशिष्ट समाजासाठी नसून समस्त मानवांच्या कल्याणासाठी उपयोगी पडले. आज जगाला गुरु नानकदेवजी सारख्या विचारसारणी असणाऱ्या संतांच्या उपदेशांची गरज आहे. एकप्रकारे, गुरु नानक देव जी यांचा ५५० व्या प्रकाशपर्वानिमित्त दिव्यक्षण रूपात पुनरागमनच होत आहे. या दिव्यक्षणाची अनुभूती सर्व शांतीप्रिय मानवांना घडावे अशीच सदिच्छा व्यक्त करतो. 
--रवींद्रसिंघ मोदी, जनसंपर्क अधिकारी सचखंड गुरूद्वारा बोर्ड, नांदेड. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com