दीड हजार रुपयांत खर्च कसा भागवायचा?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

खेर्डाच्या शेतकऱ्याचा प्रश्‍न, उत्पादन खर्चही निघाला नसल्याने हताश

उस्मानाबाद : महिन्याला दीड हजार रुपये उत्पन्न मिळाले, तर कुटुंबातील चार माणसांचा खर्च कसा भागवायचा?, असा प्रश्‍न खेर्डा (ता. कळंब) येथील रणजित जाधव या शेतकऱ्याने उपस्थित केला आहे. श्री. जाधव यांनी एका एकरातील पिकातून केवळ सहा हजार 800 रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळविले. तर उत्पादन खर्च सोळा हजार 300, तर त्यातून सात पोती सोयाबीनमधून 23 हजार 100 रुपये उत्पन्न हाती आले. सोयाबीन पाच महिन्यांत घेतले जाते. म्हणजेच पाच महिन्यांत जेमतेम सहा हजार 800 रुपयांचे उत्पन्न, त्यानुसार महिन्याला केवळ एक हजार 360 रुपये त्यांच्या हातात पडलेत. 

खेर्डा (ता. कळंब) येथील रणजित जाधव यांनी एक एकरमध्ये सोयाबीनची पेरणी केली होती. सुरवातीस पाऊस झाला नसल्याने पेरणीस विलंब झाला. त्यामुळे पीक चांगले आले नाही अन्‌ त्यानंतर पावसाने संपूर्ण सोयाबीन काळपट पडल्याने अपेक्षित उत्पन्न हातात आले नाही. जेमतेम सहा हजार 100 रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. पाच महिन्यांचे पीक गृहीत धरले तरी महिन्याला जेमतेम दीड हजार रुपये त्यांच्या पदरात पडलेत.

महत्त्वाची बातमी :  दहावी पास आहात का? तुम्हाला या क्षेत्रात मिळेल सरकारी नोकरी

कुटुंबात चार सदस्य असल्याने कुटुंबाचा खर्च महिन्याला दीड हजार रुपयांमध्ये कसा भागवायचा? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केल्याने विदारकता दिसून येत आहे. परतीच्या पावसाने एवढे मोठे नुकसान झाले असताना शासनाकडून एकरी तीन हजार 200 रुपयांची मदत देण्याचा निर्णय किती तुटुंपुंजा आहे, हेही यावरून पाहायला मिळत आहे. 

एका एकरात असा झाला जमा-खर्च 
पेरणीसाठी एक हजार रुपये, मोगडा; तसेच कुळविण्यासाठी एक हजार रुपये, पेरणीपूर्व पाळी 500 रुपये, पेरणी 700 रुपये, बियाणे दोन हजार रुपये, खतासाठी 1500 रुपये, कोळपणी (दोन वेळा) 1500 रुपये, औषधी फवारणी दोन हजार रुपये, काढणीसाठी 3500 रुपये, मळणी (14 ठिके) सात क्विंटल 2100 रुपये, मालवाहतुकीकरिता 500 रुपये असा एकूण खर्च 16 हजार 300 रुपये खर्च झाला आहे. यातून सात क्विंटल उत्पन्न मिळाले आहे; मात्र तेही उत्कृष्ट दर्जा नसल्याने कमी भाव मिळाला. त्यांनी तीन हजार 300 रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे सोयाबीन विक्री केले असून, त्यातून 23 हजार 100 रुपये त्यांच्या पदरात पडले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How to spend the cost of one and a half thousand rupees?