लातूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नाट्यगृह कसे

पालकमंत्री अमित देशमुख; तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी विचार करायला हवा होता
Amit Deshmukh
Amit DeshmukhSakal

लातूर - जिल्हाधिकारी हे दंडाधिकारी (मॅजेस्ट्रेट) असतात. त्यामुळे त्यांच्या कार्यालयाच्या परिसरात काय असावे व काय नसावे यावर बंधने आहेत. त्यांच्या कार्यालय परिसरात नाट्यगृह कसे असू शकते. उद्या तेथे लावण्या होतील, गाण्याचे कार्यक्रम होतील, मनोरंजन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होतील ते योग्य नाही. नाट्यगृहाचे बांधकाम करण्यापूर्वी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी विचार करायला हवा होता. आता त्या ठिकाणी नाट्यगृह करायचे की सभागृह याचा विचार जिल्हाधिकारी करीत आहेत, अशी माहिती पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

लातूर शहर जिल्हा काँग्रेस मीडिया सेलच्या वतीने आयोजित केलेल्या सुसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या कार्यकाळात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नाट्यगृहाला मंजुरी देवून काम सुरु करण्यात आले होते. सध्या हे काम अर्धवट अवस्थेत आहे. शहराला नाट्यगृहाची गरज आहे, ते कधी होणार या प्रश्नावर श्री. देशमुख म्हणाले, नाट्यगृहाची खूप दिवसापासूनची मागणी आहे. पण ते नाट्यगृह शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असले पाहिजे. याचा प्रयत्न सुरु आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नाट्यगृह कसे असू शकते. तेथे दंडाधिकारी बसतात. त्यांच्या कार्यालयाच्या परिसरात असे नाट्यगृह असणे योग्य नाही. तेथे चांगले सभागृह होवू शकते. याचा विचार जिल्हाधिकारी करीत आहेत. औसा तालुक्यातील शिंदाळा येथे शासनाच्या वतीने मराठवाड्यातील सर्वात मोठा ६० मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी श्री. देशमुख यांनी दिली. जिल्ह्यातील संपूर्ण उसाचे गाळप मे अखेरपर्यंत पूर्ण होईल. या करीता नांदेड, सोलापूर जिल्ह्यातील ४० हार्वेस्टर मागवले आहेत. सभासद व बिगर सभासद भेदभाव न करता ऊस तोडणी कार्यक्रमास प्राधान्य दिले जात आहे. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खासगीकरण नव्हे तर भागीदारीतून चालविण्याचा प्रस्ताव आहे. केंद्र शासन आणि निती आयोगाच्या सूचनेनुसार हा प्रस्ताव तयार केला आहे. या विषयात विरोधकांनी गैरसमजातून आंदोलन केले. खासदारांनी देखील केंद्रीयमंत्र्यांना पत्र दिले. पहिल्यांदा त्यांनी केंद्र शासनाचे धोरण पहावे. यावरही केंद्र शासनाने पीपीपी रद्द केली तर आमची काहीच हरकत नाही, असे श्री. देशमुख म्हणाले. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, ॲड. दीपक सूळ, काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. किरण जाधव, ॲड. समद पटेल, मीडिया प्रमुख व्यंकटेश पुरी आदी उपस्थित होते.

पाण्यावरचे राजकारण `रुटीन`

गेल्या काही दिवसापासून शहरात नळाला पिवळे पाणी येत होते. हा प्रश्न रासायनिक प्रक्रियेतून निर्माण झाला होता. हे कोणी व्यक्तीने मुद्दाम केलेले नव्हते. हे सर्वानाच माहित होते. असे असताना देखील हळद घालून पाण्याचे आंदोलन करण्यात आले. लातुरात पाण्यावरचे राजकारण रुटीन झाले आहे, अशी टीका पालकमंत्री अमित देशमुख यांनी विरोधकांवर केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com