औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल उंचावला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मे 2019

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवारी (ता. २८) जाहीर करण्यात आला.

औरंगाबाद - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवारी (ता. २८) जाहीर करण्यात आला. जिल्ह्याचा सरासरी निकाल ८९.२२ टक्‍के इतका लागला आहे. यंदाही जिल्ह्यात मुलांपेक्षा नेहमीप्रमाणे मुलींनीच आघाडी घेतली आहे.

जिल्ह्यातील कला, वाणिज्य, विज्ञान व किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाच्या ६० हजार ७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी ५३ हजार ५२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा सरासरी निकाल ८९.२२ टक्‍के इतका लागला आहे. यावर्षी औरंगाबाद जिल्ह्यातून ३६ हजार ९१९ मुले; तर २३ हजार १५१ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ३२ हजार २२७ मुले व २१ हजार २९५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यंदाही जिल्ह्यात मुलांपेक्षा नेहमीप्रमाणे मुलींनीच आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातून यंदा ९२.१३ टक्के मुली व ८७.३९ टक्के मुलांनी यश संपादन केले. मुलींचा निकाल मुलांपेक्षा पाच टक्‍क्‍यांनी जास्त लागला आहे.

जिल्ह्यात दोन हजार ३५४ विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ८५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थीचा जिल्ह्याचा निकाल ३६.३२ टक्के एवढा लागला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पॉइंट सात टक्‍क्‍यांनी जिल्ह्याचा निकाल वाढला आहे.

जिल्ह्याची तुलनात्मक टक्केवारी 
२०१५ - ९२ टक्के
२०१६ - ८७.७१ टक्के
२०१७ - ८९.७६ टक्के
२०१८ - ८९.१५ टक्के
२०१९ - ८९.२२ टक्के


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HSC result of Aurangabad district was raised