औरंगाबाद - राज्यातून हजला जाणाऱ्यांना सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हज हाउस बनविण्यात येणार असून, जिल्हानिहाय समित्यांची स्थापनाही लवकरच केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
हज समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच ते औरंगाबादच्या दौऱ्यावर आले होते. सिद्दिकी म्हणाले, 'आम्हाला हजला जाणाऱ्यांच्या अडचणी सोडवायच्या आहेत. त्या अनुषंगाने सर्वत्र दौरे करून लोकांच्या अडचणी समजून घेत आहे. हज हाउससाठी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाला बजेट पाठविणार आहे. गेल्या वेळी हजसंदर्भात सरकारने बजेटची तरतूद केली होती. यंदाही तरतूद करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. हजसाठी जहाजावरील प्रवास पुन्हा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. यंदा आम्हाला 2 हजार 378 हाजी मिळाले आहेत. यासह खासगी टुर्स ऍण्ड ट्रॅव्हर्ल्सतर्फे हजला जाणाऱ्यांची मोठी लूट होते. हे रोखण्याचे कामही आम्ही करणार आहोत.''
|